महाराष्ट्रातील नेत्यांनी कर्नाटकात लावली होती प्रचाराला हजेरी, तिथे काय लागला निकाल?

महाराष्ट्रातील नेत्यांनी कर्नाटकात लावली होती प्रचाराला हजेरी, तिथे काय लागला निकाल?

Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आणि राजकीय पक्षांनी निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली. या निवडणुकीचा निकाल काल शनिवारी (ता. 13 मे) जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत भाजपला धूळ चारली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी सुद्धा कर्नाचकात प्रचार सभांना हजेरी लावली होती. (leaders of Maharashtra had campaigned in Karnataka) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis), काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Congress leader Prithviraj Chavan), अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी कर्नाटकात जाऊन आपापाल्या पक्षातील उमेदवारांचा प्रचार केला.

हेही वाचा – Karnataka Election 2023: ‘या’ कारणांमुळे कर्नाटकात काँग्रेसला मिळाला ऐतिहासिक विजय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुबळी, धारवाड आणि इंडी या मतदारसंघात प्रचार केला होता. यातील हुबळी तालुक्यातील तीनपैकी दोन जागांवर भाजप आणि एका ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. तर इंडी आणि धारवाडच्या जागांवर काँग्रेसचा विजय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कापू आणि उडुपी या मंतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या भागात भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झालेला आहे.

निपाणी मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणुकीसाठी उभा केला होता. पण त्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. तर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील निपाणीत हजेरी लावली होती. पण त्यांच्या देखील उमेदवाराचा येथे पराभव झाला आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी बेळगाव ग्रामीणमध्ये प्रचार केला होता. तेथे काँग्रेसने बाजी मारली असून ते खानापूर येथेही गेले होते, खानापूरमध्ये मात्र त्यांना पराभूत व्हावे लागले असून या ठिकाणी भाजपचा विजय झाला.

कर्नाटकातील बंडखोरही झाले पराभूत
2019 मध्ये बेळगाव – कर्नाटकातील काँग्रेस-जनता दल (सेक्युलर) सरकारविरोधात 17 आमदारांनी बंड केले होते. या 17 पैकी 11 आमदारांचा या निवडणुकीत जोरदार पराभव झाला आहे. पक्षांतर केलेल्या १७ मतदारसंघांपैकी फक्त ६ ठिकाणी उमेदवारांना आपली आमदारकी वाचवता आली आहे. 11 ठिकाणी काँग्रेस, जनता दलाने विजय मिळवत गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवला आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव
बेळगाव-महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटलेला पाहायला मिळत आहे. कर्नाटकात असलेली महाराष्ट्र एकीकरण समिती ही कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी कन्नड वासियांशी आणि राज्य सरकारशी कायम लढा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने देखील आपले काही उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले होते. यातील तिन्ही उमेदवार पराभूत झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हजेरी लावली होती.

First Published on: May 14, 2023 10:53 AM
Exit mobile version