Loksabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यासाठी होशियार; लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी

Loksabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यासाठी होशियार; लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी

लोकसभा निवडणूक 2024 चा दुसरा टप्पा

नवी दिल्ली : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा माहौल आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी काल बुधवारपर्यंत (27 मार्च) अर्ज दाखल करण्याची मुदत होती. तर 30 मार्च रोजी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच आता लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीत रंग भरले आहेत.

हेही वाचा… Loksabha Election 2024 : नेताजी सुभाषचंद्र बोस देशाचे पहिले पंतप्रधान; कंगनाने पुन्हा तोडले तारे

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 102 जागांसाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील 5 जागांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी 89 जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील 8 जागांचा समावेश असून त्याची अधिसूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने काढली आहे.

महाराष्ट्रातील 8 मतदारसंघ

लोकसभा निवडणूक 2024च्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील अमरावती (अनुसूचित जाती), बुलढाणा, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या 8 मतदारसंघांचा समावेश आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : मी रडणारी नाही, लढणारी वाघीण; मुनगंटीवारांच्या टीकेला धानोरकरांचे चोख प्रत्युत्तर

दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 4 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. उमेदवारीसाठी दाखल झालेल्या सर्व अर्जांची 5 एप्रिल रोजी छाननी होईल तर 8 एप्रिलला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

किती राज्ये?

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आसाम (4 जागा), बिहार (11 जागा), छत्तीसगड, कर्नाटक, केरळ तसेच मध्य प्रदेश (7 जागा), राजस्थान (13 जागा), त्रिपुरा (1 जागा), उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्म-काश्मीर आणि महाराष्ट्र (8 जागा) या राज्यांतील एकूण 89 जागांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिसूचना काढली असली तरी बहुतेक ठिकाणी उमेदवारांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या इच्छुक उमेदवारांची धडधड वाढली आहे. प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, अशी सर्वच उमेदवारांची तक्रार आहे. दरम्यान, आता अधिसूचना काढल्याने उमेदवारांच्या नावांचीही राजकीय पक्षांकडून घोषणा होताना दिसेल.

First Published on: March 28, 2024 6:51 PM
Exit mobile version