आमदार-खासदार खरेदी करण्याचं रेटकार्ड ठरलंय; संजय राऊतांचा नवा आरोप

आमदार-खासदार खरेदी करण्याचं रेटकार्ड ठरलंय; संजय राऊतांचा नवा आरोप

नुकतंच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाकडून हा महत्वपूर्ण आणि ठाकरे गटाला धक्का देणारा निर्णय देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर बुधवारी (ता. २२ फेब्रुवारी) सुनावणी करण्यात येणार आहे. याबाबत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर पैसे घेऊन हा निर्णय दिल्याचा आरोप केलेला असतानाच आता पुन्हा एकदा राऊत यांनी सत्ताधार्यांकर आरोप करत टीका केली आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “या लोकांनी एक रेटकार्ड बनवले आहे. या देशात खरेदी-विक्रीसाठी असे रेटकार्ड कधीच बनले नाही. जर मुंबईतील नगरसेवक खरेदी करायचा असेल तर त्याची किंमत २ कोटी रुपये, आमदाराची खरेदी किंमत ५० कोटी, खासदारांची किंमत ७५ कोटी, अशी किंंमत लावण्यात आलेली आहे. तर शाखाप्रमुखाची किंमत ५० लाख. त्याच्यावर असणाऱ्या लोकांची आणखी वेगळी किंमत आहे. यासाठी एजंटही नियुक्त करण्यात आले आहेत. ते कमिशनवर काम करत आहेत. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एका गटाने आपले एक रेटकार्ड बनवले आहे. कुठून येतो इतका पैसा?. कुठे आहे ईडी, इन्कम टॅक्स,” असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहेत.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रावर आणि शिवसेनेवर अन्याय करणारा हा निर्णय आहे. सुप्रीम कोर्ट हा देशातल्या जनतेसाठी लोकशाहीसाठी शेवटचा आशेचा किरण आहे. म्हणून निवडणूक आयोगाच्या अतिरेकी निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात भूमिका मांडण्याचं ठरवलं आहे. मुख्य न्यायधीश, खंडपीठ, सर्वोच्च न्यायालय याचा देशातील लोकशाहीत काय चाललंय, याचा काळजीपूर्वक विचार करून वधस्तंभाकडे जाणाऱ्या लोकशाहीला वाचवतील,” असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा – शिंदेंच्या शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण? राष्ट्रीय कार्यकारिणीत निर्णय होण्याची शक्यता

निवडणूक आयोगावर शाब्दिक हल्ला करताना संजय राऊत म्हणाले, “आयोगाचा निर्णय हा एकतर्फी आहे. मेरी मर्जी वाल्यांच्या मर्जीसाठी दिलेला आहे. शिवसेना आणि चिन्ह, दडपशाही, दबाव, सत्ता, पैसा या माध्यामातून हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन हजार कोटीचं पॅकेज यासाठी वापरण्यात आलंय. ६ महिन्यातलं राजकारण असत्य आणि खोटेपणावर अवलंबून आहे.”

First Published on: February 21, 2023 12:10 PM
Exit mobile version