…तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे होते, संजय राऊतांचा शिंदे गटाला सवाल

…तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे होते, संजय राऊतांचा शिंदे गटाला सवाल

मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी ‘उठाव’ केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. पण याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचा समाचार घेत बंडखोरीबाबत गोंधळ निर्माण करू नका, असा सल्ला दिला आहे.

महाविकास आघाडीत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली राहून शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी बंडाचा झेंडा फडकावला. पण त्यांच्या या भूमिकेवरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

हेही वाचा – मुंबईत पावसाची संततधार सुरूच, आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा

सन 2014च्या निवडणुकीत आमचे हिंदु्त्व मजबूत असताना हिंदुत्ववादी भाजपाने जेव्हा शिवसेनेची साथ सोडली तेव्हा तुम्ही गप्प का बसले? 2019मध्ये हिंदुत्ववादी भाजपाने हिंदुत्ववादी शिवसेनेला दिलेला शब्द फिरवला, तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे गेले होते? अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी शिंदे गटावर केली.

संभ्रम निर्माण करू नका?
एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदारांनी सुरुवातीला हिंदुत्वाच्या भूमिकेवर उठाव केल्याचे सांगितले. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस निधी देत नसल्याचे कारण त्यांनी दिले. नंतर काही लोक हस्तक्षेप करत असल्याची सबब त्यांनी पुढे केली. आता ते माझ्यावर ठपका ठेवत आहेत, त्यामुळे नेमकी कशासाठी वेगळी भूमिका घेतली, हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी निश्चित करावे. वाटल्यास त्यासाठी एक कार्यशाळा घ्यावी. पण त्यातून गोंधळ तसेच संभ्रम निर्माण करू नका, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.

हेही वाचा – शासकीय जागेवर बांधा झोपड्या, राहुल नार्वेकरांच्या नावे अफवा, 40 गजाआड

First Published on: July 7, 2022 10:16 AM
Exit mobile version