उद्धव ठाकरे हेच आमचे शिवसेनाप्रमुख : संजय राऊत

उद्धव ठाकरे हेच आमचे शिवसेनाप्रमुख : संजय राऊत

शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना मिळाल्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी खासदारांनी एकनाथ शिंदे हेच शिवसेना पक्षप्रमुख असल्याचा दावा केला आहे. यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी आमच्यासाठी उद्धव ठाकरे हेच आमचे शिवसेना प्रमुख आहेत, असे म्हंटले आहे. तर यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर देखील हल्लाबोल केला आहे.

यावेळी राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे हेच पक्षाचे प्रमुख राहतील तेच आमचे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. हे निवडणूक आयोग ठरवणार नाही. त्यांचे नेतृत्व आम्ही स्वीकारलं आहे. कोण शिंदे गट त्यांनी त्यांचं पाहावं. शिवसेना नाव तसेच राहिल. आमच्या शाखा आणि शिवसैनिक तिथेच बसतील तिथेच राहतील. पक्ष आमचाच आहे. निवडणूक आयोगाकडून निर्णय लिहून घेतला म्हणजे पक्ष कुठेही जात नाही. शिवसेना भवनासह, शाखा आणि लाखो शिवसैनिक आमच्यासोबतच राहतील असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

४० आमदार आणि १०-१२ खासदार म्हणजे शिवसेना नाही
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत राऊत म्हणाले की, ४० आमदार आणि १०-१२ खासदार म्हणजे शिवसेना नाही. जमिनीवरील शिवसेनेमुळे हे आमदार आणि खासदार झाले. ती खरी शिवसेना आहे. याचा विचार आयोगाने केला नाही. फक्त मतांच्या आकडेवारीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. असा निर्णय कोण घेत? कोणत्या घटनेत लिहिले आहे असे आणि या निर्णयाचे स्वागत सत्ताधारी करत आहेत. कुठे आहे लोकशाही?

…म्हणून मालक भिकारी होत नाही
संजय राऊत यांनी यावेळी एका म्हणीचे उदाहरण देत शिंदे गटावर टीका केली. पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून काही मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही, असा टोला शिंदे गटाला लगावला आहे.

लोकशाहीच्या नावाने सुरु आहे हिंसाचार
शिवसेनेचा धसका घेतल्याने शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे एका भीतीतून आणि सूडभावनेतून केलेले कृत्य आहे, असा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. हे लोकशाही मार्गाने केलेले कृत्य नाही. हा लोकशाहीच्या नावाने चाललेला राजकीय हिंसाचार आहे. त्यामुळे निवडणूक घ्या आणि मग कळेल की, खरी शिवसेना कोणाची आहे ते. आहे का हिंमत निवडणूक घ्यायची, असेही राऊत यावेळी म्हणाले.

हेही वाचा – “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना;” संजय राऊतांची राणेंवर खोचक टीका

दरम्यान, याआधीच निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आले आहे. पण या मशाल चिन्हावर समता पार्टीकडून दावा करण्यात आला आहे. समता पार्टीकडून मशाल चिन्ह त्यांचे आहे असे सांगण्यात येत आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, समता पार्टीसारख्या लोकांना खोकेवाले पुढे करून आमच्या मार्गामध्ये नवे काटे पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आम्ही देखील काट्याने काटा कसा काढतात, हे पाहू.

First Published on: February 18, 2023 12:57 PM
Exit mobile version