चौक बाजारपेठेतील मेडिकलला भीषण आग, लाखो रुपयांची औषधे खाक

चौक बाजारपेठेतील मेडिकलला भीषण आग, लाखो रुपयांची औषधे खाक

चौक बाजारपेठेमध्ये असणार्‍या विद्या मेडिकलला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत मेडिकलमधील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. चौक बाजारपेठेत पराग ठाकूर यांचे विद्या मेडिकल नावाचे औषधांचे दुकान आहे. या दुकानाला पहाटे चार च्या दरम्यान शॉर्ट सर्किटने आग लागली. रस्त्याच्या पलीकडे राहणार्‍यांना त्यांच्या खिडकीतून दुकानातून धूर येताना दिसला. त्यामुळे त्यांनी मेडिकल दुकानात काम करणारे अरुण यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. अरूण यांनी त्यांचे सहकारी नरेश यांना तात्काळ माहिती दिली. अरुण हे दुकानात आल्यावर त्यांनी दुकानाचे शटर उघडले तेव्हा त्यांना फ्रीज जळताना दिसला. शटर पूर्ण उघडल्यावर आगीने रौद्ररूप धारण केले.

मेडिकल दुकानात असलेले पॅमपर्स व सॅनिटरी नॅपकिन यांनी त्वरित आग पकडल्याने आगीचा भडका उडाला. छताला असलेला सिलिंग फॅन, दोन संगणक, औषधांची कपाटे जळून खाक झाली. तर औषधांच्या बाटल्यांचा स्फोट होत होता. चौक बाजारपेठेतील ग्रामस्थांनी अग्निशमन दलाला पाचारण करून घरातले पाणी आणून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दल येईपर्यंत दुकानातील माल बेचिराख झाला होता. यामध्ये जवळपास ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दुकानाच्या बाहेर आगीने येण्याचा प्रयत्न केला. बाजूच्या सराफ दुकानाच्या शटरला थोडे नुकसान झाले. मेडिकल दुकानाच्या बाजूला सोन्याची पेढी, कपड्याचे दुकान, मिठाईचे दुकान, पार्लर, पतपेढी कार्यालय आहे. मिठाईच्या दुकानात गॅस सिलेंडर होते. यामुळे सर्वच दुकाने आगीत सापडली असती. चौकचे सहायय्क पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सचिन व्हसकोटी पुढील तपास करीत आहेत. चौक बाजारपेठेमध्ये रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. रस्ता रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव मागील चार वर्षांपासून पडून आहे. त्याला प्रशासकीय मान्यता व आर्थिक तरतूद असूनही काही नेत्यांच्या व काही ग्रामस्थांच्या अडेलतट्टूपणामुळे रुंदीकरण होत नाही. रस्ता रुंदीकरण होणे किती आवश्यक आहे, हे आजच्या आगीने दिसून आले आहे.

 

First Published on: April 27, 2022 7:47 PM
Exit mobile version