ओएनजीसीच्या अंगणात नाचरे मोरा..पक्षीप्रेमी सुखावले

ओएनजीसीच्या अंगणात नाचरे मोरा..पक्षीप्रेमी सुखावले

तालुक्यात होत असलेल्या विकासामुळे वनराई नष्ट होत असताना पक्षीप्रेमी आणि निसर्ग प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ओएनजीसीच्या आवारात मोर मुक्तपणे वावरत असून, पहाटे सुरक्षा जाळीवर बसलेला हा मोर पाहून अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

डोंगर आणि जंगल उजाड झाल्यामुळे प्राणी, पक्षी नाहीसे झाले आहेत. कर्नाळा अभयारण्यालगत असलेल्या या परिसरात पूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळून यायचे. मात्र सिडको, जेएनपीटीच्या अनुषंगाने तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरू झाल्याने डोंगर सपाट होऊन जंगल नष्ट झाले आहे. त्यामुळे या भागातील वन्यजीवांनी इतरत्र आसरा घेतला. ओएनजीसीचा प्रकल्प द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याजवळ आहे. पूर्वी या डोंगरातील जंगलात अनेक वन्यजीव आढळून यायचे. मोर, लांडोर, ससे, भेकर, रानडुक्कर, बिबटे यासारखे प्राणी मोठ्या प्रमाणात होते. मात्र काही वर्षांपासून डोंगराचे उत्खनन सुरू झाले असून, मोठ्या प्रमाणात जंगल तोडण्यात आले आहे. त्याचाच परिणाम म्हणून या भागातील वन्यजीव नष्ट झाले आहेत.

या भागात राहिलेले मोर त्यातल्या त्यात ओएनजीसी प्रकल्पातील झाडांमुळे आश्रयास येत असल्याचे या भागातील नागरिकांचे मत आहे. जेएनपीटी वसाहतीत देखील अशा प्रकारे मोरांनी आसरा घेतला आहे. जेएनपीटी वसाहतीत मोठ्या संख्येने झाडे आणि मोकळी जागा असल्यामुळे मोरांनी आपले बस्तान मांडले आहे. याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी शशांक कदम यांना विचारणा केला असता याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: June 8, 2021 7:37 PM
Exit mobile version