Raigad Roha Play Ground : मैदान नगरपरिषदेचे, मक्तेदारी राजकीय मंडळी, मंडळांची

Raigad Roha Play Ground : मैदान नगरपरिषदेचे, मक्तेदारी राजकीय मंडळी, मंडळांची

रोहे : भुवनेश्वर येथील जुन्या तलावाच्या जागेवर रोहे अष्टमी नगरपरिषदेने नवीन मैदान तयार केले. शहरातील सर्वच आरक्षित भूखंडे विना वापराच्या इमारती उभारण्यात, काहींवर असलेली आरक्षणे मतांचा टक्का टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी रद्द केल्यामुळे शहरात मैदानासाठी जागाच उपलब्ध होत नव्हती. अखेर वरसे ग्रामपंचायतीमधील कारभाऱ्यांचा हट्ट आणि रोह्यातील सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे भुवनेश्वर येथील जुन्या तलावाच्या जागी भराव टाकून मैदान तयार करण्यात आले.

यासाठी नुकताच १ कोटी रुपयांचा शासकीय निधी खर्च करून सुंदर असे खेळाचे मैदान झाले. पण मैदानाचे लोकार्पण होताच येथे रोज विविध मंडळांच्या व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा होत आहेत. यामुळे खेळायची इच्छा असणाऱ्यांना स्पर्धा पाहून खेळण्याची हौस पूर्ण करावी लागत आहे. यामुळे हे मैदान नक्की व्यावसायिक स्पर्धा भरवणाऱ्या मंडळांसाठी की रोहे शहर तसेच परिसरातील मुलांना मुक्तपणे खेळण्यासाठी, असा सवाल रोहेकर आणि युवक करत आहेत.

हेही वाचा… Raigad Fort Ropeway : शिवप्रेमींच्या सेवेत रोपवेची चौथी ट्रॉली

रोहे शहरात मैदानी खेळांसाछी स्वतंत्र आणि सुसज्ज मैदान असावे, ही अनेक वर्षांपासून मागणी होती. अखेर वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर येथील रोहे नगरपरिषदेच्या जुन्या तलावाच्या जागी नगरपरिषदेने हे मैदान उपलब्ध केले. याठिकाणी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाचा एक कोटीचा निधीही खर्च करण्यात आला. आता आपल्याला क्रिकेटसह सर्वच मैदानी खेळ मुक्तपणे खेळायला मिळणार याचा मनस्वी आनंद बच्चेकंपनी आणि युवकांना झाला. प्रत्यक्षात मैदानाचे लोकार्पण झाल्यापासून तिथे रोज विविध मंडळांच्या व्यावसायिक स्पर्धा होत आहेत.

हेही वाचा… Raigad Water Crisis : उरणकरांना 15 दिवसांतून एकदा ‘जल’दर्शन

आज तालुक्यातील होत असलेल्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन ही एक सामाजिक समस्या बनत चालली आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे आणि युवकांचे नोकरी-व्यवसायाकडे दुर्लक्ष होत आहे. अशा स्पर्धा भरवून आयोजक मंडळी राजकीय नेते, व्यावसायिक, औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांकडून मोठ्या रकमेची वर्गणी गोळा करतात. शिवाय स्पर्धेसाठी प्रवेश फी आकारून बक्कळ पैसा कमवत आहेत. असे असताना रोहे नगरपरिषदेचे सार्वजनिक असलेले मैदान या स्पर्धांसाठी फुकटात वापरले जात आहे. यासोबतच आता निवडणूक आचारसंहिता सुरु असतानाही या मैदानावर रात्री उशिरापर्यंत होत असलेल्या सामन्यांमुळे परिसरातील रहिवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सध्या परीक्षांचा हंगाम सुरू असल्याने रात्री उशिरापर्यंत लाउडस्पीकर सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, हे मैदान व्यावसायिक कारणासाठी भाडेतत्वावर देण्याचे धोरण ठरले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. म्हणूनच कोणा एका असोसिएशनच्या मालकीचे असल्याप्रमाणे या मैदानाचा असा मनमानी होणारा वापर रोहे नगरपरिषदेने बंद करावा आणि या उन्हाळी सुट्टीत हे मैदान सर्वांना खेळण्यासाठी मोकळे करावे, अशी मागणी युवक, विद्यार्थी करत आहेत.

First Published on: April 19, 2024 8:24 PM
Exit mobile version