घरमहाराष्ट्रRaigad Fort Ropeway : शिवप्रेमींच्या सेवेत रोपवेची चौथी ट्रॉली

Raigad Fort Ropeway : शिवप्रेमींच्या सेवेत रोपवेची चौथी ट्रॉली

Subscribe

महाड : रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी दोन दशकांपासून रोपवेची सुविधा आहे. यात आता रोपवे प्रकल्प प्रशासनाने चौथी ट्रॉली बसवली आहे. २३ एप्रिलपासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला ही ट्रॉली शिवप्रेमींच्या सेवेत रुजू होणार आहे. या ट्रॉलीची चाचणी नुकतीच घेण्यात आली. यामुळे रायगडावर वेगाने जाण्याचा मार्ग अधिक सोपा झाला आहे.

किल्ले रायगडावर जाण्यासाठी जोग इंजिनीअरिंग कंपनीने रायगड रोपवेची निर्मिती केली. सुरुवातीला रोपवेला विरोध झाला होता. पण, सरकारने विरोध मोडून काढला आणि रायगड रोपवे प्रकल्पाला परवानगी दिली. प्रकृतीअभावी तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला, गर्भवती, दिव्यांग ज्यांना रायगडावर जाणे शक्य नव्हते त्यांच्यासाठी रोपवे ही मोठी पर्वणी ठरली. या रोपवेच्या आता सेवेला २० वर्षे झाली आहेत. या कालावधीत किल्ले रायगडावरील गर्दी वाढली आणि रोपवेची सुविधी कमी पडू लागली. त्यामुळे रायगडावर जाण्यासाठी आणखी एक रोपवे उभा केला जावा, अशी मागणी जोर धरू लागली होती.

- Advertisement -

हेही वाचा… Mahad road News : खर्डी ते रायगड रोप-वे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायकच

नवीन रोपवे प्रकल्पाची चर्चा सुरू असतानाच जोग इंजिनीअरिंगच्या मिलेनियम प्रॉपर्टीज कंपनीने या ठिकाणी तिसरी ट्रॉली बसवली होती. हिरकणी वाडी येथील जमिनींना पडणाऱ्या भेगा आणि होणारे भूस्खलन यामुळे रायगड रोपवे परिसरात धोका निर्माण झाला होता. मात्र सत्ताधारी आणि रोपवे प्रशासन यांच्या संगनमताने याठिकाणी नियम अटी झुगारून विविध परवानग्या दिल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

आता मिलेनियम प्रॉपर्टीजने रोपवेमध्ये नव्याने चौथी ट्रॉली बसवली आहे. या चौथ्या ट्रॉलीची चाचणी यशस्वी झाली आहे. तरी या चौथ्या ट्रॉलीला घेऊन अजून काही चाचण्या होणार आहेत. त्यानंतर चौथ्या ट्रॉलीचे लोकार्पण केले जाईल, असे रायगड रोपवे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. एका ट्रॉलीत चार याप्रमाणे सध्या एकाचवेळी तीन ट्रॉलींमधून १२ पर्यटक रायगडावर जातात आणि परत येतात.

हेही वाचा… Raigad Water Crisis : पूर आणि पाणीटंचाईचा महाडचा शाप कधी पुसणार?

संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घेणार?

शिवराज्याभिषेक, शिवजयंती तसेच शिवपुण्यतिथी या कालावधीत रायगडावर गर्दीचा उच्चांक असतो. यावेळी रायगड रोपवेसाठी चार ते पाच तासांची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे अनेकांना रायगड न पाहताच परतावे लागते. यासाठी नवीन शासकीय रोपवे प्रकल्ल उभा करण्याची मागणी पुढे आली होती. त्यानुसार सरकारी जागेची पाहणी देखील सुरू केली होती. मात्र, सरकारी प्रकल्प गुंडाळण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या रायगड रोपवे प्रशासनाकडून रोपवेमध्येच बदल केले जात असल्याची चर्चा आहे.

या संपूर्ण प्रकाराबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. नवीन शासकीय रोपवे व्हावा, अशी आग्रही मागणी देखील त्यांनी केली होती. रोपवे प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात त्यांनी सरकारशी पत्रव्यवहार देखील केला होता. मात्र ते सत्तेत सहभागी झाल्यानंतर मागणी थांबली होती. आता चार ट्रॉली बसवल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

रोपवेचे तिकीट

  • एकेरी – 200 रुपये
  • रिटर्न – 310 रुपये
  • ज्येष्ठ नागरिक (रिटर्न) – 200 रुपये
  • मुले (3 फुटांपर्यंत उंच) – विनामूल्य
  • दिव्यांग – विनामूल्य
  • मुले (3 ते 4 फूट उंच) – 200 रुपये
  • 7वीपर्यंतचे विद्यार्थी (एकेरी) – 130 रु.
  • 7वीपर्यंतचे विद्यार्थी (रिटर्न) – 190 रु.
  • 8वी पुढील विद्यार्थी (एकेरी) – 190 रु.
  • 8वी पुढील विद्यार्थी (रिटर्न) – 225 रु.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -