घरमहाराष्ट्रRaigad Water Crisis : उरणकरांना 15 दिवसांतून एकदा 'जल'दर्शन

Raigad Water Crisis : उरणकरांना 15 दिवसांतून एकदा ‘जल’दर्शन

Subscribe

उरण तालुक्यात नोव्हेंबर २०२३ पासून पाणीकपात करण्यात आली आहे. सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असतो. तर उर्वरित दिवस दिवसातून तासभर पाणी मिळते.

विठ्ठल ममताबादे : आपलं महानगर वृत्तसेवा

उरण : रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या खूप भीषण झाली आहे. यात उरण शहराचा विचार केला तर पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवता यावे यासाठी सहा महिन्यांपासून आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तर उरण कोटगाव ते मोरा या दरम्यान, विविध 11 प्रभागांत गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून पाणीटंचाईची कुऱ्हाड कोसळली आहे. नियोजनाचा अभावामुळे उरणकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याची प्रतिक्रिया आहे.

सहा महिन्यांपासून पाणीकपात करूनही ऐन उन्हाळ्यात उरणकरांवर पाणीटंचाईचे संकट आणखी गडद झाले आहे. वास्तविक उरण नगरपरिषदेची स्थापना इंग्रजांच्या काळात पावणे दोनशे वर्षांपूर्वी झाली. आतातर देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. त्यानंतरही उरण पाण्याबाबत स्वयंसिद्ध व्हावे, यासाठी कोणतेही जाणीवपूर्वक प्रयत्न झाले नाहीत. उरण शहराची लोकसंख्या 40 हजारांच्या आसपास आहे. उरण शहरासह तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाने आधीच तळ गाठला आहे. यामुळे उरण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीने मागील ६ महिन्यांपासूनच मंगळवार आणि शुक्रवार असे दोन दिवस पाणीकपात लागू केली आहे. एवढेच नाही तर उर्वरित पाच दिवस दिवसातून केवळ एकच तास पाणी दिले जाते.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Water Crisis : गाळमुक्त शार्लोट तलाव केवळ स्वप्नच!

उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाची पातळी घटली आहे. दुसरीकडे सिडकोकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात घट झाली आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने धरणातील पाण्याचे वेगाने बाष्पीकरण होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा कायम ठेवण्यासाठी आणखी एका दिवस पाणीकपात होण्याची शक्यता असल्याने उरणकरांच्या घशाची कोरड वाढणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Water Crisis : कर्जतमध्ये जलजीवन योजनेचा बोऱ्या, पाणीटंचाईच्या तीव्र झळा

औद्योगिकीकरण आणि वाढत्या नागरीकरणामुळे उरण तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत पाण्याचे नियोजन झालेले नाही. रानसई धरणातून पाणपुरवठा करताना सिडकोच्या हेटवणे धरणातून दररोज उसने पाणी घ्यावे लागत आहे. पावसाळ्यानंतर सध्या सिडकोकडून दररोज 4 एमएलडी पाणी मिळते. प्रत्यक्षात सिडकोकडे १० एमएलडीची मागणी केलेली आहे. पाणी कमी पडत असल्याने उरणकरांवर जलसंकट ओढावले आहे.

पाणीटंचाईला कुणाची निष्क्रियता?

उरणमधील जलस्तोत्र वाढवण्यासाठी मंत्रालयस्तरावर प्रयत्न सुरू करण्यात आले होते. त्याचे पुढे काय झाले हे आजतागायत स्पष्ट झालेले नाही. पाणीसाठ्यात वाढ करण्यासाठी रानसई धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव होता. तो आजही सरकारकडे पडून आहे. त्यामुळे उरणवरील पाणीटंचाईचे संकट हे नैसर्गिक म्हणण्यापेक्षा सरकारची निष्क्रियता आणि उरण नगरपरिषद प्रशासनाच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे आल्याचा आरोप होत आहे.

उरण तालुका हा अरबी समुद्राच्या कुशीत आणि मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. तालुक्यात जेएनपीटी बंदर, ओएनजीसी, भारत गॅस, महावितरण प्रकल्प, एनएडी, असे राज्यासह केंद्राचे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. आता मुंबई आणि उरणला जोडणारा अटल सेतू झाला आहे. या प्रकल्पांना, रहिवाशांना उरण तालुक्यातील रानसई आणि पुनाडे धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

हेही वाचा… Raigad Water Crisis : तहानलेल्या पेण तालुक्याला ५ दिवसांआड पाणी

सिडकोच्या माध्यमातून पेण तालुक्यातील हेटवणे धरणातूनही पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, सध्या उरण तालुक्याची लोकसंख्या अडीच लाखांवर गेल्याने आणि मोठे प्रकल्प कार्यरत असल्याने पाणीपुरवठा खूपच कमी पडत आहे. उरणला लागूनच नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. त्यामुळे तालुक्याची लोकसंख्या आणखी पाच वर्षांत दुप्पट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याची गरजही वाढणार आहे. रानसई तसेच पुनाडे धरणांची पातळी मार्च-एप्रिलमध्ये घटते. म्हणूनच नवीन जलस्रोत वेगाने निर्माण करण्याची गरज आहे.

रानसई धरणाने गाठला तळ

उरण तालुक्यात 25 ग्रामपंचायती आहेत. त्यांना आणि औद्योगिक क्षेत्राला रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणाने डिसेंबरमध्येच तळ गाठला आहे. तर पूर्व विभागातील 10 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुनाडे धरणातील साठाही आटला आहे. 25 ग्रामपंचायतींच्या हद्दीतील गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यापैकी चाणजे आणि केगाव या दोन ग्रामपंचायती अनेक वर्षांपासून भीषण पाणीटंचाईने त्रस्त आहेत. करंजा, नवापाडा, सातघर, सुरकीचापाडा, डाऊरनगर आदी पाडे आणि इतर गावांतील ग्रामस्थांच्या घशाला ऐन उन्हाळ्यात कोरड पडली आहे.

१५ दिवसांतून पाणीपुरवठा

चाणजे ग्रामपंचायतीची लोकसंख्या 30 हजारांहून अधिक आहे. ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. चाणजे हद्दीतील ग्रामस्थांना 15 दिवसांतून एकदा आणि तेही फक्त एक तास पाणीपुरवठा होतो. चाणजेतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चाच्या अनेक योजना राबवण्यात आल्या. एमआयडीसीकडूनही पाणीपुरवठा केला जातो. तरीही पाणीटंचाई दूर झालेली नाही.

हेही वाचा… Raigad Water Crisis : पूर आणि पाणीटंचाईचा महाडचा शाप कधी पुसणार?

केगाव ग्रामपंचायत हद्दीतील 20 हजार लोकांना 8-10 दिवसांतून फक्त एकदाच आणि तेही तासभर पाणी दिले जाते. अनेक वर्षांपासून सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी 6 इंच व्यासाची पाईपलाईन टाकण्याची मागणी केली जात आहे. मात्र एमआयडीसी आणि ग्रामपंचायतींमध्ये तोडगा न निघाल्याने पाणीटंचाईची समस्या कायमची बनली आहे. उरण परिसरातील अनेक गावांतील विहिरी, तलावांनीही तळ गाठला आहे.

घारापुरी बेट तहानलेलेच

जगप्रसिध्द घारापुरी बेटावरही राजबंदर, मोराबंदर, शेतबंदर या तीन गावांना पाणीपुरवठा करणारे धरण डिसेंबरमध्येच आटल्याने पाणीटंचाईची स्थिती गंभीर झाली आहे. घारापूर बेटवासीयांना समुद्रमार्गे होडीने पाणीपुरवठा करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामपंचायतीने सरकारकडे केली आहे. त्यानंतरही सरकार ढिम्म राहिल्याने घारापुरी बेटावर पाण्याचे दुर्भिक्ष आहे. ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा निधीतून मुंबईतील पीरपाव बंदरातून होड्यांमधून पाणी आणण्याची तयारी केल्याचे उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले.

पुनाडे धरणीतील गाळ दुर्लक्षित

पुनाडे धरणातून पुनाडे, वशेणी, सारडे, कडापे, पिरकोन, पाले, गोवठणे, आवरे, पाणदिवे या गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र 35 वर्षे जुन्या धरणाला लागलेली गळती दूर करण्यासाठी आणि साचलेल्या गाळ काढण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे पुनाडे धरण गाळात रुतले आहे. या 9 गावांमधील 20 हजार लोक सध्या पाणीटंचाईने त्रस्त आहेत. याआधी प्रत्येक गावात एक दिवस आड तासभर पाणी सोडण्यात येत होते. मात्र पुनाडे धरणाने तळ गाठल्याने आता तीन दिवसांआड एकदिवस एक तास पाणी सोडण्याची वेळ आल्याची माहिती पुनाडे प्रादेशिक पाणीपुरवठा नळ योजना कमिटीचे अध्यक्ष अनामिक म्हात्रे यांनी दिली. या सर्व पार्श्वभूमीवर जून किंवा पाऊस पडेपर्यंत पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन उरण एमआयडीसीचे उपअभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी केले आहे.

रिकाम्या जलवाहिनीची झळ

खरेतर उरण शहराला रोज 50 लाख लीटर पाणीपुरवठी करण्याची गरज आहे. प्रत्यक्षात एमआयडीसीकडून दररोज 35 ते 40 लाख लीटर पाणी पुरवले जाते. दोन दिवस पाणीपुरवठा बंद असतो. त्यावेळी जलवाहिनी रिकामी असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पाणी सोडल्यावर रिकामी जलवाहिनी भरण्यासाठी बराच वेळ जातो. यामुळे उरणकरांना कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होतो. – झेड. आर. माने, उरण नगरपरिषद, वरिष्ठ अभियंता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -