ताकई-ढेकू रस्त्याला दुरवस्थेचा शाप!

ताकई-ढेकू रस्त्याला दुरवस्थेचा शाप!

लघू उद्योग नगरीकडे जाणार्‍या ताकई ते ढेकू रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून, दोन दिवस पडणार्‍या मुसळधार पावसात रस्ता नामशेष झाला आहे. ग्रामस्थ या रस्त्याचा उल्लेख ‘शापित रस्ता’ असा करतात.

ताकई रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भिजत घोंगडे पडलेले असताना स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेले काँक्रिटीकरणाचे काम रखडले आहे. दोन महिन्यांपूर्वी काम करण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यावरून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. ठेकेदाराने अनेक ठिकाणी खड्डे खोदून ठेवल्याने अपघाताची भीती असताना पावसाने लावलेल्या हजेरीमुळे रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे. या भागात अनेक कारखाने असल्याने अवजड वाहतूक अव्याहतपणे सुरू असते. त्यामुळे रस्ता अधिकच खचला असून, पायी चालणे देखील मुश्कील झाले आहे.

एमएमआरडीएने या रस्त्यासाठी 4 कोटी 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दोन्ही बाजूला गटारे आणि 12 मीटर सिमेंटचा रस्ता होणार असल्याने प्रवासी आणि परिसरातील नागरिक प्रचंड खूश होते. परंतु दोन दिवस पडणार्‍या मुसळधार पावसाने अपघाताचे सत्र सुरू झाले असून, या मार्गावरून प्रवास जीवघेणा बनला आहे. रस्त्यालगतच लोकवस्ती असून, एखादे अवजड वाहन घर किंवा दुकानावर कोसळल्यास जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्याला होत असलेली दिरंगाई याा भागातील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्यास कारणीभूत ठरणार आहे.

पावसाळ्यापूर्वी काम होईल असे वाटले होते. परंतु ठेकेदाराने केवळ खोदाई करून माती बाजूला सारून ठेवली असल्यामुळे रस्ता अधिकच धोकादायक झाला आहे. काँक्रिटीकरण असल्याने पावसाचे प्रमाण कमी होताच रस्त्याचे काम वेगात पूर्ण करावे, ही अपेक्षा आहे.
-संदीप ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ता, ताकई-सारसन

First Published on: June 10, 2021 6:39 PM
Exit mobile version