रायगड जिल्हा सहकारी बँकेकडून शिक्षकांना मिळणार बिनव्याजी अ‍ॅडव्हान्स वेतन

रायगड जिल्हा सहकारी बँकेकडून शिक्षकांना मिळणार बिनव्याजी अ‍ॅडव्हान्स वेतन
अलिबाग: संपूर्ण महाराष्ट्रात राज्य मध्यवर्ती संघटनेने बेमुदत कर्मचारी संप पुकारलेला असून या संपात रायगड जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचा देखील सक्रिय सहभाग आहे. परंतु या संपामुळे रायगड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यांना ऐन मार्च महिन्याच्या लगबगीमध्ये वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक विभाग शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी सदर प्रश्न सोडविण्याकरिता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडे शिक्षकांना बिनव्याजी अ‍ॅडव्हान्स वेतन मिळावे म्हणून विनंती केली. बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सदर संघटनेची विनंती मान्य केलेली असून बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी सदर सुविधा तात्काळ कार्यान्वित केली जाणार आहे असे सांगितले आहे तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना ही योजना २१ मार्च २०२३ पासून उपलब्ध असेल अशी माहिती दिली आहे. याकरिता रायगड शिक्षक संघटना समन्वय समितीने देखील बँकेचे आभार मानले आहेत.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की बँकेने गतवर्षी दिवाळीमध्ये देखील सदर सुविधा शिक्षक खातेधारकांना तात्काळ उपलब्ध करून दिली होती. त्यावेळी बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील तसेच सर्व संचालक मंडळ यांनी तात्काळ या योजनेला मान्यता देवून बँकेच्या प्रत्येक शाखाधिकारी यांनी शिक्षक ग्राहकांशी संपर्क साधून अनेकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली होती.
अत्याधुनिक सेवा सुरू
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या पगारदार खातेधारकांसाठी अ‍ॅडव्हान्स वेतन, खातेधारकांचा विमा, मोबाईल अ‍ॅप, शिवाय फोन पे, गुगल पे यांच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्याच्या अत्याधुनिक सेवा सुरू केल्याने आणि गरजेला मदत करण्याच्या ग्राहककेंद्रीत धोरणामुळे शिक्षक खातेदार वर्ग मोठ्या प्रमाणावर रायगड जिल्हा सहकारी बँकेशी जोडला गेला आहे, याचे श्रेय अर्थातच बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि संचालक मंडळ यांचे निर्णय तसेच  शाखेतील कर्मचारी यांनी दिलेली उत्कृष्ट ग्राहकसेवा याला जाते असे यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक म्हणाले. शिवाय अ‍ॅडव्हान्स वेतन सुविधेचा लाभ बिनव्याजी असून जिल्ह्यातील सर्वच शिक्षक खातेधारकांना होणार असून अधिकाधिक शिक्षक खातेधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
First Published on: March 18, 2023 8:49 PM
Exit mobile version