खोपोली-पाली मार्गावर वाहतूक कोंडी; आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडून दखल

खोपोली-पाली मार्गावर वाहतूक कोंडी; आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडून दखल

खोपोली: पाली-खोपोली मार्गावरील अ‍ॅडलॅब इमॅजिका थीम पार्क येथे सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक शनिवार, रविवारी मोठ्या संख्येने येतात. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून पाली फाटा बाह्यवळण घेत चौकात आल्यावर वाहनांची गर्दी होते. परिणामी खोपोली-पाली आणि पेणकडे जाणार्‍या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यातच मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे कोकणातील बहुसंख्य पर्यटक पालीमार्गे जात असतात. रविवारी अ‍ॅडलॅब इमॅजिकाचा वर्धापन दिन असल्यामुळे पर्यटकांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीची दखल आमदार अनिकेत तटकरे यांनी घेत राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांच्याशी संपर्क करीत देवन्हावे गावातील तरुणांना मदतीसाठी पाठवले.
एक्स्प्रेस वेवर शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने मुंबईसह अन्य भागातून पर्यटक लोणावळा किंवा कोकणात, तसेच खालापुरात असणारा इमॅजिका थीम पार्ककडे येत असतात. एक्स्प्रेस वेवर नवीन लेनचे काम सुरू आहे. तसेच अवजड वाहनेही असल्याने वाहनांची संख्या नेहमीपेक्षा अधिक वाढत असल्याने या ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने होत असते. तर एक्स्प्रेस वेवरून खालापूर एक्झिटमधून कोकणात किंवा पर्यटकांना इमॅजिका थीम पार्ककडे जाण्यासाठी एक्स्प्रेस वेवरून बाहेर पडून पाली मार्गाकडे जात असतात. या ठिकाणी ब्रिजचे काम सुरू आहे. मात्र वाहनचालक लवकर जाण्याच्या उद्देशाने ओव्हरटेक करून बेशिस्तपणाचे प्रदर्शन करतात. यातून वाहनांची कोंडी होते.
त्यामुळे स्थानिक गावांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्यामुळे नाराजी व्यक्त होत असते. यावर मार्ग काढण्यासाठी खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांच्या आदेशानुसार या ठिकाणी पोलीस कर्मचारी, तसेच ट्रॅफिक पोलीस कार्यरत असतात. मात्र तरीही वेगवेगळ्या मार्गाने वाहनचालक अधिक रांगा लावून वाहतूक कोंडी करीत असल्याने त्याचा प्रत्येक सुट्टीच्या दिवशी विपरित परिणाम हमखास दिसून येतो. यावर वाहतूक पोलिसांनी अधिकपणे नजर ठेवून बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्याची मागणी होत आहे.

खोपोली-पाली मार्गावर दर शनिवार, रविवारी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असतो. कोकणात जाण्यासाठी पाली-खोपोली मार्ग सुसह्य ठरत आहे. मात्र त्याचवेळी इमॅजिका थीम पार्क येथे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांचा नाहक खोळंबा होतो. थीम पार्कच्या व्यवस्थापनाने वाहतूक कोंडीची समस्या रोखण्यासाठी नियोजन केले पाहिजे.
– अनिकेत तटकरे, सदस्य, विधान परिषद

First Published on: May 30, 2023 10:10 PM
Exit mobile version