महाडमधील अतिवृष्टीतील बाधित पाणी पुरवठा योजना कोलमडलेल्याच

महाडमधील अतिवृष्टीतील बाधित पाणी पुरवठा योजना कोलमडलेल्याच

महाडमध्ये २२ जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरात तालुक्यातील शासकीय मालमत्तेबरोबर गावागावातील नळपाणी पुरवठा पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. तर विहिरी कोसळण्याच्या घटना देखील घडल्या. या पाणीपुरवठा योजना, स्त्रोत आदींच्या दुरुस्तीसाठी स्थानिक प्रशासनाला निधीची गरज आहे. मात्र अद्याप या योजनांना दमडी देखील मिळालेली नसल्याने ऐन टंचाई काळात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाड तालुक्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन महापूर आला. यामध्ये रस्ते, शासकीय इमारती, पूल आदी शासकीय मालमत्तेसह अनेक गावांमधील नळपाणी पुरवठा योजनांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. बहुतांश पाणीपुरवठा योजना या नदी किनारी असल्याने नदीच्या पुराच्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात पाईपलाईन उखडून गेली. तर काही ठिकाणी पडझड होऊन नुकसान झाले. महाडमध्ये जवळपास ७२ नळ पाणीपुरवठा योजना तर १४ विहिरी आणि २ तलावांचे नुकसान झाल्याचा अहवाल महाड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने वरिष्ठ कार्यालयाला सादर केला आहे. यामध्ये पारमाची, बारसगाव, वरंध, गोठे बु, मोहोत, राजेवाडी, भावे, कांबळे तर्फे बिरवाडी, कुंभे शिवथर, कोथूर्डे, नागाव, वाळसुरे, चापगाव, पडवी पठार, आकले, मोहोप्रे, किंजलोळी, काळीज, बिरवाडी, कोंडीवते यांसह अन्य गावातील नळ पाणीपुरवठा योजना तर रानवडी, वाळण येथील पंपगृह दुरुस्ती, तर कोल आणि नागावमधील विहीर वाहून गेली होती.

पावसाळ्यात या योजना बाधित झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी अन्य स्त्रोतांचा वापर नागरिक करत आहे. शिवाय पूर परिस्थितीमध्ये आलेल्या मदतीमध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा साठा आल्याने पिण्याच्या पाण्याची ग्रामीण भागात मोठी टंचाई जाणवली नाही. पावसाळ्यानंतर मात्र पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवणार आहे. टंचाई काळाच्या आतच या योजना दुरुस्त होणे गरजेचे होते. महाड पाणीपुरवठा विभागाकडून प्रस्ताव सादर केला असून या बाधित योजनांना आता निधीची प्रतीक्षा आहे.

या संपूर्ण दुरुस्तीसाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला तब्बल ५कोटी ४७ लाख रुपयांची गरज असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. मात्र महापुरानंतर जवळपास आठ महिने झाले तरी अतिवृष्टीत बाधित झालेल्या पाणीयोजनांना अद्याप एक दमडी देखील मिळालेली नाही. यामुळे ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात उद्भवलेल्या पाणी टंचाई काळात नागरिकांची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. महाड तालुक्यात सद्य स्थितीत ग्रामीण आणि डोंगराळ भागात १७ ग्रामपंचायती आणि ३० वाड्यांना पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे.

महाडमध्ये आलेल्या महापुरात ग्रामीण भागातील शहरालगत असलेल्या गावांतील नळ पाणीपुरवठा योजना, विहिरी आणि तलावांचे नुकसान झाले आहे. यामुळे काही गावात पर्यायी व्यवस्था करून पाणीपुरवठा सुरु आहे. प्रस्ताव पाठवले असून लागणार्‍या निधीची पूर्तता झाल्यानंतर कामे केली जातील
– जे. यु. फुलपगारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महाड

फोटो

 

First Published on: April 21, 2022 7:50 PM
Exit mobile version