इंस्टाग्रामवरही कोहली किंग!

इंस्टाग्रामवरही कोहली किंग!

भारताचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर बरेच विक्रम रचत असतो. मात्र, आता त्याने मैदानाबाहेरही आपणच किंग असल्याचे दाखवून दिले आहे. कोहलीने इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर ५० मिलियन (५ कोटी) फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा गाठणारा तो पहिला भारतीय आहे. त्याने इंस्टाग्रामवर आतापर्यंत ९३२ पोस्ट केल्या असून १४८ जणांना फॉलो करत आहे.

३१ वर्षीय कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याने इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणार्‍या भारतीयांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. या यादीत दुसर्‍या स्थानी अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस (४९.९ मिलियन) आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंस्टाग्रामवर ३४.५ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तिआनो रोनाल्डो इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणार्‍यांत अव्वल स्थानी असून त्याचे २०० मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

First Published on: February 19, 2020 3:23 AM
Exit mobile version