विना मास्क फिरणाऱ्या मुंबईकरांवर कारवाई; पालिकेची आतापर्यंत ३० कोटींची दंड वसुली

विना मास्क फिरणाऱ्या मुंबईकरांवर कारवाई; पालिकेची आतापर्यंत ३० कोटींची दंड वसुली

कोरोना मास्क

मुंबईत सर्वसामान्यांसाठी काही प्रमाणात लोकल सुरु केल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कोरोनाला आळा घालण्याचे पालिका यंत्रणा व आरोग्य खात्याने प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेले नियम न पाळणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी दिवसभरात विना मास्क फिरणाऱ्या १३ हजार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २७ लाख रुपये दंड वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत कारवाई करण्यात आलेल्या एकूण नागरिकांची संख्या १५ लाख १६ हजार ३९८ इतकी झाली असून त्यांच्याकडून तब्बल ३० कोटी ६९ लाख ९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

९० पथके ठिकठिकाणी तैनात

मुंबईत मागील वर्षी मार्चपासून कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने स्वच्छता राखणे, सामाजिक अंतर राखणे (सोशल डिस्टंसिंग) आणि मास्क घालणे बंधनकारक केले. मात्र, काही नागरिक या नियमांचे पालन करत नसल्याने पालिकेने क्लिनअप मार्शलची ९० पथके ठिकठिकाणी तैनात करून दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. त्यामुळे काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेला मदत झाली.

पुन्हा कारवाईला सुरुवात

गेल्या महिन्यात कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याने १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी मर्यादित वेळेत लोकल सेवा सुरू करण्यात आली. परंतु, त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. परिणामी पालिकेने पुन्हा एकदा कडक कारवाईला सुरुवात केली आहे. बुधवारी दिवसभरात पालिकेच्या पथकांनी १३ हजार ५५७ नागरिकांवर कारवाई करून तब्बल २७ लाख ११ हजार ४०० रुपयांची दंड वसुली केली.

First Published on: February 17, 2021 10:39 PM
Exit mobile version