अमर हिंद शालेय खो-खो

अमर हिंद शालेय खो-खो

महात्मा गांधीला दुहेरी यश

महात्मा गांधी विद्या मंदिरच्या मुले आणि मुली या दोन्ही संघांनी दादरच्या अमर हिंद मंडळाने आयोजित केलेल्या आंतरशालेय खो-खो स्पर्धेचे जेतेपद पटकावले. महात्मा गांधी विद्या मंदिरने मुलांच्या अंतिम सामन्यात डॉ. शिरोडकर हायस्कूलचा तर मुलींमध्ये सेंट इझाबेल स्कूलचा पराभव केला.

अमर हिंद मंडळाच्या क्रीडांगणावर झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात महात्मा गांधी विद्या मंदिरने डॉ. शिरोडकर हायस्कूलला ९-५ असे एक डाव आणि ४ गुणांनी पराभूत केले. या सामन्यात महात्मा गांधीकडून धीरज भावे (३:१० मि. संरक्षण आणि २ गडी), गणेश हेगरे (नाबाद १:५०, १:५० मि. संरक्षण आणि २ गडी), रामचंद्र हेगरे (२:२०, ३:४० मि. संरक्षण आणि १ गडी), अर्जुन अनिवसे (१:४० मि. संरक्षण आणि ३ गडी) यांनी अष्टपैलू खेळ केला.

मुलींच्या अंतिम सामन्यात महात्मा गांधीने सेंट इझाबेल स्कूलवर ९-३ अशी एक डाव आणि ६ गुणांनी मात केली. या सामन्यात काजल गायकवाडने केलेल्या दमदार ५:५० मिनिटे संरक्षणामुळे, तर आक्रमणात साक्षी वाकेळकरच्या ४ गडी यामुळे महात्मा गांधी विद्यामंदिरने हा सामना जिंकला. या दोघींना मुस्कान नाईक (नाबाद १:५०, २:१० मि. संरक्षण आणि २ गडी), सिद्धी हिंदळेकर (नाबाद २:३० मि. संरक्षण आणि १ गडी) यांनी चांगली साथ दिली. उपविजेत्या सेंट इझाबेलच्या आर्या तावडे आणि श्रावणी पवारने चांगला खेळ केला, पण त्यांना आपल्या संघाला सामना जिंकून देता आला नाही.

First Published on: February 1, 2019 4:42 AM
Exit mobile version