अमित पांघल अव्वल स्थानी!

अमित पांघल अव्वल स्थानी!

अमित पांघल

जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अमित पांघलने (५२ किलो) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बॉक्सिंग टास्क फोर्स क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. मागील दहा वर्षांत जागतिक बॉक्सिंग क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा अमित हा भारताचा पहिलाच बॉक्सर आहे. ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता विजेंदर सिंग जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा पहिला भारतीय बॉक्सर होता. त्याने २००९ मध्ये हे स्थान मिळवले होते.

२४ वर्षीय पांघलने मागील काही वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने २०१८ राष्ट्रकुल आणि एशियाड स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले होते. तर मागील वर्षी तो जागतिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवणारा पहिला भारतीय बॉक्सर ठरला. याच दमदार कामगिरीमुळे त्याने ४२० गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले. क्रमवारीत अव्वल स्थान पटकावल्याचा मला आनंद आहे. पुढील महिन्यात होणार्‍या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सीडींग मिळताना मला याचा फायदा होईल. माझा आता आत्मविश्वास वाढला आहे आणि पहिल्याच प्रयत्नात ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा माझा प्रयत्न असेल, असे पांघल म्हणाला.

मेरी पाचव्या स्थानावर!
महिलांच्या क्रमवारीत भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम ५१ किलो वजनी गटात पाचव्या स्थानावर आहे. जागतिक स्पर्धेतील सर्वात यशस्वी बॉक्सर असणार्‍या मेरीने मागील वर्षी कांस्यपदक मिळवले, जे तिचे या स्पर्धेतील आठवे पदक ठरले. तिच्या खात्यात २२५ गुण आहेत. तिची प्रतिस्पर्धी निखत झरीन ७५ गुणांसह २२ व्या स्थानी आहे. ६९ किलो वजनी गटात लोव्हलिना बॉर्गोहेन तिसर्‍या स्थानी आहे.

First Published on: February 14, 2020 5:34 AM
Exit mobile version