अश्विनचे ते कृत्य खेळाडूवृत्तीच्या विरुद्ध !

अश्विनचे ते कृत्य खेळाडूवृत्तीच्या विरुद्ध !

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने जॉस बटलरला मंकडींग पद्धतीने बाद केले होते. राजस्थानच्या डावातील १२ व्या षटकात अश्विन चेंडू टाकण्याआधी थांबला आणि नॉन-स्ट्रायकर बटलरने क्रीज सोडल्यावर अश्विनने त्याला चेंडू न टाकता धावचीत केले. या प्रकारानंतर अश्विनवर जोरदार टीका झाली. त्याचे हे कृत्य खेळाडूवृत्तीच्या विरुद्ध होते, असे टीकाकारांचे मत होते. मात्र, इंग्लंडमधील प्रचलित मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) समर्थन केले होते, पण आता त्यांनी आपली भूमिका बदलली असून, अश्विनने केलेले कृत्य खेळाडूवृत्तीच्या विरोधात असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.

आम्ही जे घडले त्याचे ‘पुन्हा’ पुनरावलोकन केले आहे आणि अश्विनने जे केले ते खेळाडूवृत्तीला धरून होते, असे आम्हाला वाटत नाही. अश्विन क्रीजमध्ये पोहोचून बराच वेळ थांबला आणि इतक्या वेळात गोलंदाजाने चेंडू टाकला असेल असे नॉन-स्ट्राईकवरील फलंदाजाला वाटले असावे. जेव्हा चेंडू टाकणे अपेक्षित होते, तेव्हा बटलर क्रीजमध्येच होता, असे एमसीसीचे अकादमी व्यवस्थापक फ्रेझर स्टुअर्ट यांनी सांगितले.

याआधी मात्र एमसीसीने अश्विनच्या कृतीला विरोध दर्शवला नव्हता. नॉन-स्ट्राईकवर उभ्या असलेल्या फलंदाजाला मंकडींग करण्यापूर्वी ताकीद दिलीच पाहिजे, असा कोणताही नियम क्रिकेटमध्ये नाही, असे एमसीसीने त्यावेळी म्हटले होते. अश्विनच्या त्या कृत्यावर शेन वॉर्न, इयॉन मॉर्गन, मायकल वॉन, स्टुअर्ट ब्रॉड अशा आजी-माजी खेळाडूंनी टीका केली होती.

First Published on: March 29, 2019 4:44 AM
Exit mobile version