बॉक्सर अमित पांघळला अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन

बॉक्सर अमित पांघळला अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन

सौजन्य - India Today

भारताचा बॉक्सर अमित पांघळ याने नुकतेच पार पडलेल्या एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती. या त्याच्या कामगिरीमुळे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने अर्जुन पुरस्कारासाठी त्याचे नाव पुढे केले आहे.

एशियन गेम्समध्ये सुवर्ण कामगिरी 

अमित पांघळने एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती. त्याने ४९ किलो वजनी गटात हे सुवर्ण पदक मिळवले होते. त्याने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उझबेकिस्तानचा गतविजेता दुस्मातोवचा पराभव केला होता. त्याच्यासह सोनिया लाथर आणि गौरव बिधुरी यांचीही नावे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने अर्जुन पुरस्कारासाठी पुढे केली आहेत.

आनंद शब्दात सांगू शकत नाही 

पुरस्कारासाठीच्या नामांकनाबाबत अमित म्हणाला, “मला नामांकन मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. हा आनंद मी शब्दात सांगू शकत नाही. मी जिंकलेले पदकच माझ्यासाठी बोलते.” अमितने यावर्षीच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक मिळवले होते. तर एशियन गेम्समध्ये त्याने सुवर्ण पदक पटकावले होते. त्याबाबत तो म्हणाला, “पदक जिंकणे हे माझे स्वप्न होते. ते पूर्ण झाले. आता जर मला अर्जुन पुरस्कार मिळाला तर माझे अजून एक स्वप्न पूर्ण होईल.”

नामांकनाबद्दल आभार

अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन जाहीर झाल्यानंतर पांघळने ट्विटरवरून बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे आभार मानले. तसेच यापुढेही भारतासाठी पदकं जिंकण्याचा निर्धार असल्याचे त्याने लिहिले.

First Published on: September 11, 2018 11:02 PM
Exit mobile version