आशियाई बॉक्सिंग स्पर्धा

आशियाई बॉक्सिंग स्पर्धा

कविंदर बिश्त, अमित पंघाल उपांत्यपूर्व फेरीत

भारताचे बॉक्सर कविंदर सिंग बिश्त (५६ किलो) आणि अमित पंघाल (५२ किलो) यांनी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ५६ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत कविंदर सिंग बिश्तने विश्व विजेत्या कैरत येरालियेव्हला पराभवाचा धक्का दिला. महिलांमध्ये सोनिया चहललाही ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम ४ मध्ये प्रवेश करण्यात यश आले.

उपांत्यपूर्व फेरीत कविंदर सिंग बिश्तने विश्व विजेत्या कैरत येरालियेव्हचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि आशियाई चॅम्पियनशिपमधील पहिले पदक निश्चित केले. अमित पंघालने ५२ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हसनबॉय दुसमातोववर चुरशीच्या सामन्यात ३-२ अशी मात केली. दुसमातोवने एशियाडमध्ये पंघालचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले होते. त्याआधी या दोघांमध्ये जागतिक चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीतही लढत झाली होती. ही लढत दुसमातोवनेच जिंकली होती.

महिलांमध्ये सोनिया चहलने कोरियाच्या जो सोन व्हाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तसेच ४९ किलो वजनी गटात दीपक सिंहनेही आगेकूच केली. लोव्हलिना बॉर्गोहेनला (६९ किलो) मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. तिला चिनी तैपेईच्या चेन निन-चीनने ०-५ असे पराभूत केले. तसेच सीमा पुनिया (८१ किलो वरील) आणि रोहित टोकस (६४ किलो) यांचाही पराभव झाला.

First Published on: April 23, 2019 4:47 AM
Exit mobile version