बंगळुरूची पराभवाची हॅटट्रिक; वॉर्नर, बेरस्टोवची शतके

बंगळुरूची पराभवाची हॅटट्रिक; वॉर्नर, बेरस्टोवची शतके

वॉर्नर, बेरस्टोवची शतके

सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेरस्टोवच्या दमदार शतकांच्या जोरावर सनरायजर्स हैद्राबादने आयपीएलच्या सामन्यात बंगळुरूचा ११८ धावांनी धुव्वा उडवला. हा बंगळुरूचा यंदाच्या मोसमातील सलग तिसरा पराभव होता. वॉर्नर आणि बेरस्टोव या सलामीच्या जोडीने १८५ धावांची भागीदारी केली. या जोडीची यंदाच्या मोसमातील ही सलग तिसरी शतकी भागीदारी होती. त्यामुळे त्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, बंगळुरूच्या गोलंदाजांना आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवता आला नाही. बेरस्टोव आणि वॉर्नर यांच्या अप्रतिम फलंदाजीमुळे हैद्राबादने २० षटकांत २ विकेट गमावत २३१ धावांचा डोंगर उभारला. ही हैद्राबादची आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या होती. बेरस्टोवने ५६ चेंडूत ११४ धावा केल्या. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ७ षटकार लगावले, तर वॉर्नरने ५५ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद १०० धावा केल्या. बेरस्टोव बाद झाल्यावर फलंदाजीसाठी आलेल्या विजय शंकरनेही १ षटकार खेचत ३ चेंडूत ९ धावा केल्या. बंगळुरूकडून युझवेंद्र चहलने ४४ धावा देत १ विकेट घेतली.

२३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मोहम्मद नबीच्या भेदक गोलंदाजीमुळे बंगळुरूचा डाव ११३ धावांत आटोपला. नबीने पार्थिव पटेल (११), शिमरॉन हेटमायर (९), एबी डी व्हिलियर्स (१) आणि शिवम दुबे (५) यांना झटपट माघारी पाठवले. संदीप शर्माने कोहलीला ३ धावांवर माघारी पाठवले. यानंतर कॉलिन डी ग्रँडहोम (३७), प्रयास रे बर्मन (१९) आणि उमेश यादव (१४) यांनी काही काळ चांगली फलंदाजी केली, मात्र १९ व्या षटकात आरसीबीचा डाव संपुष्टात आला. ११४ धावा करणार्‍या बेरस्टोवला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

संक्षिप्त धावफलक –

सनरायजर्स हैद्राबाद : २० षटकांत २ बाद २३१ (बेरस्टोव ११४, वॉर्नर १००; चहल १/४४) विजयी वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : १९.५ षटकांत सर्वबाद ११३ (डी ग्रँडहोम ३७, प्रयास रे बर्मन १९; नबी ४/११, संदीप शर्मा ३/१९).

First Published on: April 1, 2019 4:22 AM
Exit mobile version