फलंदाजांनी अधिक जबाबदारीने खेळणे गरजेचे

फलंदाजांनी अधिक जबाबदारीने खेळणे गरजेचे

bangar

भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात ३२ धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची ३ बाद २७ अशी अवस्था झाली होती. त्याआधी भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ९९ धावांत ४ विकेट, तर दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात ७५ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे तिसर्‍या एकदिवसीय सामन्यानंतर आमच्या फलंदाजांनी अधिक जबाबदारीने खेळले पाहिजे, असे भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला.

आम्हाला वारंवार डाव कोसळणे महागात पडू शकते. आमच्या फलंदाजांनी जबाबदारीने खेळून मोठ्या भागीदारी करणे गरजेचे आहे, पण आम्ही पुन्हा एकत्रित होऊन चांगली कामगिरी करू याची मला खात्री आहे. जर आमच्या तीनच विकेट गेल्या असतील आणि आम्हाला अखेरच्या १३-१४ षटकांमध्ये १०० धावाही करायच्या असतील, तरीही आम्ही त्या करू शकतो. मात्र, ५ विकेट गेल्या असताना या धावा करणे शक्य होत नाही. कोणत्याही संघाला ५ विकेट लवकर गमवायला आवडत नाही. आमचा संघ असा आहे, जो मोठ्या भागीदारी करतो. याआधी आम्ही ३ विकेट फार कमी वेळात गमावल्या आहेत.या मालिकेत तसे होत आहे आणि पुढील दोन सामन्यांत आम्हाला त्यात सुधारणा करण्याची गरज आहे, असे कोहली म्हणाला.

इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले असले तरी कोहलीने तिसर्‍या सामन्यात ९५ चेंडूंत १२३ धावांची खेळी केली. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ४१ वे शतक होते. हे शतक माझ्या सर्वोत्तम शतकांपैकी एक होते, असेही कोहली म्हणाला.

विराटमुळे इतर खेळाडूंचे प्रदर्शन फिके वाटते – बांगर

आम्ही एकाच खेळाडूवर अवलंबून आहोत असे नाही. मात्र, विराट सध्या ज्याप्रकारे खेळतो आहे त्यामुळे इतर फलंदाजांचे प्रदर्शन फिके वाटते. तो एक असा खेळाडू आहे जो आपल्या खेळात काय उणिवा आहेत, याच्या शोधात असतो आणि त्या उणिवा तो लगेच दूर करतो. कदाचित हेच कारण आहे की त्याने त्याच्या खेळाचा स्तर इतका उंचावला आहे. सतत उत्कृष्टतेच्या शोधात असणे हाच विराटचा गुण त्याला इतका चांगला खेळाडू बनवते, अशा शब्दांत भारताचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीची स्तुती केली.

First Published on: March 10, 2019 4:10 AM
Exit mobile version