बीसीसीआयकडून अश्विन, मिताली राजची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

बीसीसीआयकडून अश्विन, मिताली राजची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

अश्विन, मिताली राजची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

भारताचा प्रमुख ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. खेलरत्न हा भारतीय खेळांमधील सर्वात मोठा आणि मानाचा पुरस्कार मानला जातो. तसेच अर्जुन पुरस्कारासाठी बीसीसीआयने अनुभवी सलामीवीर शिखर धवन, फलंदाज लोकेश राहुल आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची नावे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जुन पुरस्कारासाठी एकाही महिला क्रिकेटपटूची शिफारस करण्यात आलेली नाही.

भारताची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू

खेलरत्न पुरस्कारासाठी मितालीच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. परंतु, अर्जुन पुरस्कारासाठी महिला क्रिकेटपटूचे नाव पाठवण्यात आलेले नाही, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. मिताली ही भारताची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू मानली जाते. तिने मागील आठवड्यातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२ वर्षे पूर्ण केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम ३८ वर्षीय मितालीच्या नावे असून तिने २१५ सामन्यांत ७१७० धावा केल्या आहेत.

अश्विनची कसोटीत सातत्यपूर्ण कामगिरी 

दुसरीकडे अश्विन हा भारताचा प्रमुख ऑफस्पिनर असून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७९ सामन्यांत ४१३ विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अश्विनचा चौथा क्रमांक लागतो. तसेच एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये त्याला अनुक्रमे १५० आणि ४२ गडी बाद केले आहेत. परंतु, आता त्याची मर्यादित षटकांच्या संघात निवड केली जात नाही. कसोटी क्रिकेटमध्ये मात्र तो सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. अश्विन आणि मिताली या दोघांनाही याआधी अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.

First Published on: June 30, 2021 3:39 PM
Exit mobile version