डिव्हिलियर्स, स्मिथविरुद्ध गोलंदाजी करणे आव्हानात्मक – कुलदीप

डिव्हिलियर्स, स्मिथविरुद्ध गोलंदाजी करणे आव्हानात्मक – कुलदीप

कुलदीप यादव

दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स आणि ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ यांच्याविरुद्ध गोलंदाजी करणे सर्वात आव्हानात्मक आहे, असे विधान भारताचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने केले. या दोघांची फलंदाजीची शैली आणि पद्धत इतरांपेक्षा जरा वेगळी आहे असेही कुलदीपला वाटते. कुलदीपने मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाआधी अप्रतिम कामगिरी केली होती. मात्र, विश्वचषकानंतर त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. परंतु, आता तो आपला फॉर्म सुधारण्यास उत्सुक आहे.

तो निवृत्त झाल्याचा आनंद 

स्मिथ माझ्याविरुद्ध मागे जाऊन (बॅक फूटवर) खेळतो. तो चेंडू एकदम उशिरा मारतो. त्याच्याकडे चेंडू खेळण्यासाठी खूप वेळ असतो. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणे खूप अवघड आहे. एबी डिव्हिलियर्सने खासकरून एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याची खेळण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे. आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे आणि गोलंदाजांसाठी आनंदाची गोष्ट आहे. या दोघांविरुद्ध गोलंदाजी करणे फारच आव्हानात्मक आहे. मात्र, या दोघांव्यतिरिक्त मला कोणत्याही फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करताना अडचण आलेली नाही, असे कुलदीपने सांगितले.

सतत संघातून आत-बाहेर

तसेच विश्वचषकानंतरच्या खराब कामगिरीबाबत कुलदीप म्हणाला की, मागील वर्षीच्या विश्वचषकासाठी मी खूप तयारी केली. मला विश्वचषकात फारशा विकेट मिळाल्या नाहीत, पण मी चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर मी सतत संघातून आत-बाहेर होत आहे. तुम्ही सातत्याने सामने खेळत नसल्यास संधी मिळाल्यावर चांगली कामगिरी करण्याचा तुमच्यावर दबाव असतो. त्यामुळेच बहुधा मी सातत्यपूर्ण कामगिरी करू शकलेलो नाही.

First Published on: July 4, 2020 2:30 AM
Exit mobile version