बुमराहचा फॉर्म चिंताजनक!

बुमराहचा फॉर्म चिंताजनक!

भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मागील काही काळात सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले आहे. मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात बुमराहला दुखापत झाली. त्यामुळे जवळपास चार महिने त्याला मैदानाबाहेर राहावे लागले. त्यानंतर स्थानिक क्रिकेट न खेळातच त्याने भारतीय संघात पुनरागमन केले. सध्या सुरु असलेल्या न्यूझीलंड दौर्‍यातील टी-२० मालिकेच्या पाच सामन्यांत बुमराहला केवळ ६ विकेट्स मिळाल्या. तर पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत त्याची बळींची पाटी कोरीच राहिली. बुमराहचा सध्याचा फॉर्म चिंताजनक आहे, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने व्यक्त केले.

जसप्रीत बुमराहचा फॉर्म हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. भारताला विकेटची आवश्यकता असताना कर्णधार विराट कोहली चेंडू बुमराहच्या हातात सोपवतो. मात्र, न्यूझीलंड दौर्‍यात त्याला फारशा विकेट मिळालेल्या नाहीत. तसेच त्याला योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे त्याला फलंदाजांवर दबाव टाकता आलेला नाही. न्यूझीलंडच्या फलंदाजांनाही श्रेय दिले पाहिजे. त्यांनी बुमराहविरुद्ध खूपच चांगली फलंदाजी केली आहे. रॉस टेलरचे विशेष कौतुक केले पाहिजे, असे लक्ष्मण म्हणाला.

सैनीने केले प्रभावित!                                                                                                      न्यूझीलंडविरुद्ध दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात २७४ धावांचा पाठलाग करताना भारताची ७ बाद १५३ अशी अवस्था होती. परंतु, रविंद्र जाडेजा आणि नवदीप सैनी या आठव्या जोडीने ७६ धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, हे दोघे बाद झाल्याने भारताचा पराभव झाला. या दोघांचे कौतुक करताना लक्ष्मण म्हणाला, रविंद्र जाडेजाने दुसर्‍या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर त्याने शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनीला हाताशी घेत न्यूझीलंडला झुंज दिली. सैनीने मला प्रभावित केले. मात्र, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथमने आपल्या फारसा अनुभव नसलेल्या गोलंदाजांचा अप्रतिम वापर करत ही मालिका जिंकली.

First Published on: February 11, 2020 2:57 AM
Exit mobile version