क्रिकेटचा स्तर घसरला!

क्रिकेटचा स्तर घसरला!

-शोएब अख्तर

क्रिकेट विश्वचषक संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या स्पर्धेत ३ साखळी सामने बाकी असून त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे सामने होतील. गतविजेता ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड या संघांना उपांत्य फेरी गाठण्यात यश आले आहे, तर न्यूझीलंड किंवा पाकिस्तान यांच्यापैकी एक संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल. यंदाची विश्वचषक स्पर्धा अधिक आव्हानात्मक होण्यासाठी आयसीसीने केवळ १० संघांना यामध्ये सहभाग दिला होता. मात्र, अव्वल ५-६ संघ वगळता इतर संघांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे या स्पर्धेवर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने टीका केली आहे. या स्पर्धेत क्रिकेटचा स्तर घसरला आहे, असे मत अख्तरने व्यक्त केले.

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात क्रिकेटचा स्तर घसरल्याचे पाहायला मिळाले आहे. फलंदाजांना धावा करणे खूप सोपे झाले आहे. गोलंदाजांमध्ये फारशी गुणवत्ता नाही. १९९०, २००० च्या काळात गोलंदाज ज्या वेगाने गोलंदाजी करायचे, तसेच फिरकीपटू ज्याप्रकारे गोलंदाजी करायचे, तसे आताचे गोलंदाज करताना दिसत नाहीत. आता तीन पॉवर-प्ले असतात आणि दोन नवे चेंडू वापरले जातात. त्यामुळे फलंदाजी करणे अगदीच सोपे झाले आहे, असे अख्तर म्हणाला.

विश्वचषकात बुधवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला. या विजयामुळे इंग्लंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर पाकिस्तान आगेकूच करणार नाही हे जवळपास निश्चित झाले. न्यूझीलंडच्या या पराभवाबाबत अख्तर म्हणाला, न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध चांगले खेळ केला नाही. त्यांनी झुंज दिलीच नाही आणि इंग्लंडने त्यांना सहज पराभूत केले. ते अगदी नवख्या खेळाडूंप्रमाणे खेळले.

पाकची कामगिरी दमदार -मोईन खान

पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी बांगलादेशला ३१६ पेक्षा अधिक धावांनी पराभूत करावे लागेल. त्यामुळे त्यांना आगेकूच करणे अवघड झाले आहे. मात्र, पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली नाही, तरी त्यांची या स्पर्धेतील कामगिरी दमदार आहे, असे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोईन खान म्हणाला. पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला, तर हा त्यांचा या स्पर्धेतील पाचवा विजय असेल. त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे त्यांची कामगिरी निराशाजनक आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. माझ्या मते त्यांनी या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे आणि त्यांना स्पर्धेनंतर मोठ्या बदलांची गरज नाही, असे मोईनने सांगितले.

First Published on: July 5, 2019 4:29 AM
Exit mobile version