ही गुलाबी हवा!

ही गुलाबी हवा!

विद्युतझोतातील (डे-नाईट) कसोटी क्रिकेट सामान्याचा विराट कोहलीच्या भारतीय संघाला अखेरीस मुहूर्त सापडलाच. कोलकात्याचा ईडन गार्डन्सवर २२ ते २६ नोव्हेंबर यादरम्यान भारत-बांगलादेश यांच्यातील पिंक बॉल टेस्ट (एसजी) रंगेल. भारतातील या पहिल्यावहिल्या तसेच क्रिकेट जगातील बाराव्या विद्युतझोतातील कसोटी सामन्याच्या आयोजनाला हिरवा कंदील मिळाला तो भारतीय नियामक मंडळाचा (बीसीसीआय) नूतन अध्यक्ष तसेच भारतीय संघाचा माजी यशवंत कर्णधार सौरव गांगुलीच्या निर्णायक निर्णायामुळे! इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ विद्युतझोतातील कसोटी सामने खेळले आहेत. परंतु, कर्णधार कोहलीच्या आडमुठेपणामुळे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅडलेड विद्युतझोतातील कसोटी रद्द करून लाल चेंडूचा दिवासाचा कसोटी सामना खेळणे भाग पडले. टी-२० क्रिक्रेट, डीआरएस यांना सुरुवातीला नाके मुडरणार्या बीसीसीआयचा विद्युतझोतातील कसोटी क्रिकेटला विरोध अपेक्षितच होता. परंतु, सौरव गांगुलीने बीसीसीआय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर अवघ्या काही मिनिटातच कर्णधार कोहली विद्युतझोतातील पिंक बॉल कसोटी खेळायला तयार झाला.

विविध शहरात, देशांमध्ये आतापर्यंत ११ विद्युतझोतातील कसोटी सामने खेळले गेले आहेत. ते सारे निकाली ठरले असून ईडनची कसोटीदेखील त्याला अपवाद ठरू नये! ‘सिटी ऑफ जॉय’ अर्थात कोलकाता हे क्रिकेट प्रेमी, क्रीडाप्रेमींचे शहर. ईडन गार्डन्सची महती सर्वश्रुत असून भारत-बांगलादेश विद्युतझोतातील कसोटीला बंगाली बंधू-भगिनींचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभेल यात शंकाच नाही. या सामन्याच्या पहिल्या तीन दिवसांची तिकिटे हातोहात संपलीदेखील. ईडनवर बांगलादेशचे क्रिकेट शौकिनही मोठ्या संख्येने हजेरी लावतील.

कोलकत्याला विद्युतझोतातील पहिल्यावहिल्या कसोटीचा मान लाभला हे उचितच. ब्रिटिश राजवटीत कोलकाता हीच राजधानी होती. अनेक संस्मरणीय लढती ईडन गार्डन्सवर रंगल्या असून भारतातील पहिल्या वर्ल्डकपचा (१९८७) अंतिम सामनादेखील इथेच झाला. राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांची संस्मरणीय भागीदारी, हरभजनच्या हॅटट्रिकमुळे सौरव गांगुलीच्या भारतीय संघाने स्टीव वॉच्या ऑस्ट्रेलियन संघाचा विजयी अश्वमेघ रोखला तो ईडनवरच! फॉलोऑन मिळालेल्या भारताने कांगारूंवरच डाव उलटवला होता.

ईडन गार्डन्सवरच १६ जून २०१६ मध्ये मोहन बागान वि. भवानीपूर क्लब यांच्यातील पहिलावहिला तीन दिवसीय दिवस-रात्र सामना खेळवण्यात आला. बंगाल क्रिकेट असोसिएशन (सीएबी) हे आधुनिक तंत्राचे पाईक असल्याचे यावरून स्पष्ट होते. सौरव गांगुली सदैवच विद्युतझोतातील क्रिकेटचा खंदा पुरस्कर्ता असून त्याच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ईडनवरच भारतातील पहिला विद्युतझोतातील कसोटी सामना खेळजा जातोय ही भूषणावह घटना!

क्रिकेटला भारतात नेहमीच लोकप्रियता लाभली असून ७०-८० च्या दशकापर्यंत कसोटी क्रिकेटला सुगीचे दिवस होते. ९० च्या दशकापासून खासकरून सचिनच्या आगमनानंतर वनडे क्रिकेट फोफावले अन कसोटी क्रिकेट सामन्यांची संख्या तसेच प्रेक्षकांचा पाठिंबा रोडावला. २००७ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय संघाने पाकला नमवून जोहान्सबर्गच्या वॉन्डर्सवर टी-२० वर्ल्डकप जिंकला अन भारतात टी-२० क्रिकेटला उधाण आले. त्यातच पुढच्या मोसमात (२००८) आयपीएलची (इंडियन प्रीमियर लीग) भर पडली याचा फटका कसोटी क्रिकेटला बसला. अलिकडेच कोहलीच्या भारतीय संघाने द.आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादले. परंतु, दुर्दैवाने या कसोटी सामन्यांना प्रेक्षकांचा फारसा पाठिंबा लाभला नाही. खेळाडूंच्या विक्रमी कामगिरीवर त्यामुळे विरजण पडले, दस्तुतरखुद्द विराट कोहलीने याबाबत नाराजी व्यक्त केली.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांचा अपवाद वगळता कसोटी क्रिकेटला प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद लाभतो. त्यामुळे भारतातील प्रमुख केंद्रावरच (मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली, बंगळुरू) कसोटी सामने आयोजित करण्यात यावेत अशी सूचना कर्णधार कोहलीने बीसीसीआयला केली. क्रिकेटची व्याप्ती वाढली असून पुरस्कर्ते, मीडिया खासकरून टेलिव्हिजनचे थेट प्रक्षेपण, इंटरनेट यामुळे क्रिकेटचा प्रचार-प्रसार सर्वदूर पोहोचला आहे. विद्युतझोतातील सामन्यामुळे प्रेक्षक पुन्हा स्टेडियमकडे वळतील. ‘पिंक बॉल’ क्रिकेटचे वारे कोलकात्यात जोरदार वाहू लागल्याची चर्चा आहे. ईडनचा परिसर गुलाबी रंगात उजळून निघाला आहे.

ईडनच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी दिगज्जांची उपस्थिती लाभेल. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उपस्थित राहतील. लोकाश्रयाबरोबरच, राजाश्रयदेखील क्रिकेटला लाभेल. विराट कोहलीच्या अव्वल संघाची गाठ पडेल ती दुबळ्या बांगलादेशशी. अष्टपैलू शकिब अल हसनची उणीव पाहुण्यांना प्रकर्षाने जाणवेल. परंतु, त्याला शकिबच जबाबदार आहे. बुकींशी असलेल्या ‘तथाकथित’ संबंधामुळे शकिबवर आयसीसीने बंदी घातली ते योग्यच झाले. सलामीवीर तमिम इक्बाल कौटुंबिक कारणास्तव भारत दौर्याला मुकला. या दोन आधारस्तंभांच्या अनुपस्थितीत बांगलादेशचा संघ अधिकच दुबळा झाला आहे. दोन तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांऐवजी दुबळ्या, विजोड संघाशी विराट कोहलीच्या भारतीय संघाला सामना करावा लागेल. तरीदेखील क्रिकेट प्रेमी बंगालीत ‘आमी ओरवने चिलम’ (मी तिकडे होतो) चा राग आळवतील.

First Published on: November 21, 2019 3:47 AM
Exit mobile version