Ranji Trophy : दिल्लीचा मुंबईवर दमदार विजय; ४२ वर्षांनंतर केली मात

Ranji Trophy : दिल्लीचा मुंबईवर दमदार विजय; ४२ वर्षांनंतर केली मात

रणजी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच दिल्लीच्या संघाने इतिहास घडवला आहे. दिल्लीच्या संघाने मुंबईच्या संघाचा पराभव केला आहे. तब्बल ४२ वर्षांनंतर दिल्लीने मुंबईच्या संघावर विजय मिळवला. या विजयासह दिल्लीने मुंबईवर दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. (delhi creates history delhi beat mumbai for first time in 43 years ranji trophy 2022 23)

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात हिंमतसिंगच्या नेतृत्वाखालील खेळणाऱ्या दिल्लीच्या संघाने शुक्रवारी मुंबईचा 8 गडी राखून पराभव केला. दिल्लीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सरफराज खानच्या शतकाच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 293 धावा केल्या. मात्र, अन्य एकाही फलंदाजाला 40 धावांचा आकडाही गाठता आला नाही. या सामन्यात सरफराजने 16 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 125 धावांची खेळी केली. दिल्लीकडून प्रांशू विजयरानने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

दिविज मेहराच्या भेदक गोलंदाजीमुळे मुंबईच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. मुंबईने दिल्लीसमोर केवळ 95 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य दिल्लीने अवघ्या दोन विकेट गमावत पूर्ण केले. दिल्लीचा या मोसमातील हा पहिला विजय आहे. यापूर्वी झालेल्या पाच सामन्यांपैकी दोन सामन्यात दिल्लीला पराभव पत्करावा लागला होता. तसेच, तीन सामने अनिर्णित राहिले होते.

दिल्लीने पहिल्या डावात 369 धावा केल्या आणि मुंबईवर 76 धावांची आघाडी घेतली. वैभव रावल आणि कर्णधार हिम्मत सिंग यांच्या शानदार भागीदारीमुळं दिल्लीला ही मजल मारता आली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली. वैभव रावलनं शतकी खेळी खेळताना 114 धावा केल्या, तर हिम्मत सिंगनं 85 धावा करत त्याला साथ दिली. मुंबईकडून तुषार देशपांडेने चार बळी घेतले. मुंबईचा दुसरा डाव मात्र अत्यंत निराशाजनक ठरला. कर्णधार अजिक्‍य रहाणे (51) वगळता एकाही फलंदाजाला छाप पाडता आली नाही, तर पहिल्या डावातील शतकवीर सरफराज खान शून्यावर बाद झाला. दिविज मेहरानं मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला. त्याने 13 षटकांत अवघ्या 30 धावा देऊन 5 बळी घेत बाजी पलटवली. मुंबईचा संघ दुसऱ्या डावात 179 धावांत गारद झाला.


हेही वाचा – चोरांचा ICCला ‘जमतारा’ स्टाइल गंडा; 21 कोटींचा लावला चुना

First Published on: January 20, 2023 3:51 PM
Exit mobile version