धोनी …क्रिया आणि प्रतिक्रिया

धोनी …क्रिया आणि प्रतिक्रिया

धोनी

जयपूरच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला असला तरी शेवटच्या षटकात झालेल्या वेगळ्याच राड्यामुळे हा सामना कायम स्मरणात राहिल . धोनीचा संयम सुटला आणि तो चक्क मैदानात आला आणि पंचांशी वाद घालू लागला. या वर्तणुकीसाठी धोनीला सामन्याच्या ५० टक्के मानधन दंड ठोठवण्यात आले. त्यानंतर कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या धोनीच्या अशा वागण्याने सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला.

तसेच क्रिडा क्षेत्रातील नामवंतांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. घडलेल्या प्रकाराबाबत भारताचे माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांनी धोनीची कानउघडणी केली आहे. कोणत्याही खेळाडूने अशा पद्धतीची वर्तणूक करणे हे खेळाला लाज आणणारे आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने हे समजून घेतले पाहिजे की एखादा खेळाडू हा खेळापेक्षा मोठा नसतो, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी महेंद्र सिंह धोनीच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी धोनीला कंट्रोलमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे.

धोनीने पंचांशी हुज्जत घालणे चुकीचे होते. त्याने असे करायला नको होते,असे गावसकर म्हणाले. चेंडू जर कमरेच्या वर असेल तर चेंडू नो बॉल देण्याचा निर्णय पंच करत असतात,असे पंचाच्या निर्णयाचे समर्थन करताना ते म्हणाले. एकीकडे धोनीला सल्ले मिळत असताना माजी कर्णधार सौरव गांगुली मात्र धोनीच्या मदतीला धावला. आपण सर्व माणूस आहोत, असे मत व्यक्त करताना गांगुलीने धोनीची पाठराखण केली. धोनी एक उत्तम प्रतिस्पर्धक आहे आणि हीच गोष्ट उल्लेखनीय आहे.’’ असेही गांगुली म्हणाला.

First Published on: April 14, 2019 4:11 AM
Exit mobile version