हा पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते!

हा पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते!

विराट कोहलीचे उद्गार

भारताचा कर्णधार विराट कोहली आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. त्याचा आक्रमकपणा काहींना आवडतो, तर त्याची शैली खिलाडूवृत्तीला धरून नाही, असे काहींना वाटते. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी विराटचा स्पिरिट ऑफ क्रिकेट हा पुरस्कार देत गौरव केला. परंतु, खिलाडूवृत्तीसाठीचा हा पुरस्कार मिळाल्याचे स्वतः विराटलाही आश्चर्य वाटले.

बरीच वर्षे चुकीच्या कारणांमुळे चर्चेत राहिल्यानंतर स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार मिळाल्याचे मला आश्चर्य वाटत आहे. काही वेळा आपण एखाद्याविषयी फार लवकर मत बनवतो. आमच्या संघातील युवा खेळाडूंसोबत ही गोष्ट झालेली मला आवडणार नाही. प्रत्येकाला स्वतःला समजण्यासाठी मोकळीक दिली पाहिजे, असे विराट म्हणाला.

२०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग प्रकरणातील सहभागामुळे ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली. बंदीचा कालावधी संपल्यानंतर त्याचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या भारत आणि ऑस्ट्रेलियातील साखळी सामन्यात चाहते स्मिथला चिडवत होते. मात्र, ही गोष्ट विराटला आवडली नाही आणि त्याने ईशारा करत चाहत्यांना हा प्रकार थांबण्यास सांगितले. याच गोष्टीसाठी विराटला स्पिरिट ऑफ क्रिकेट हा पुरस्कार मिळाला. एखाद्या व्यक्तीने केलेल्या चुकीचा फायदा घेणे योग्य नाही. भारतीय चाहत्यांची आणि आपल्या देशाची ही ओळख असू शकत नाही, असे विराट म्हणाला.

First Published on: January 16, 2020 5:18 AM
Exit mobile version