बांगलादेशचे कर्णधारपद मिळेल असे वाटले नव्हते!

बांगलादेशचे कर्णधारपद मिळेल असे वाटले नव्हते!

मोमिनुल हकचे विधान

बांगलादेशचा प्रमुख क्रिकेटपटू शाकिब अल हसनवर आयसीसीने काही दिवसांपूर्वी दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मॅच फिक्सिंगसाठी बुकीने त्याच्याशी संवाद साधला, पण याबाबतची माहिती शाकिबने आयसीसीला दिली नाही. त्यामुळेच आयसीसीने त्याच्यावर ही कारवाई केली. त्याच्या जागी फलंदाज मोमिनुल हकची बांगलादेशच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. मोमिनुलने याआधी स्थानिक क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाचे नेतृत्व केलेले नाही. त्यामुळे मला बांगलादेशचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळेल असे वाटले नव्हते, असे मोमिनुल म्हणाला.

माझी कर्णधारपदी निवड होईल हे मला अपेक्षित नव्हते. मी अजिबातच तयार नव्हतो. मला बांगलादेशचे कर्णधारपद भूषवण्याची किंवा कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. आता मी नेतृत्व करणार असल्याने माझ्यावरील जबाबदारी किंवा दबाव वाढलेला नाही. मी जर स्वतःचा नैसर्गिक खेळ केला आणि फक्त संघासाठी धावा करण्याचा विचार केला, तर कर्णधारपदाचा माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे मोमिनुल म्हणाला.

मोमिनुलने आतापर्यंत ३६ कसोटी सामन्यांत बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले असून यात त्याने ४१.४७ च्या सरासरीने २६१३ धावा केल्या आहेत. आगामी भारताविरुद्धच्या मालिकेत त्याला पहिल्यांदा बांगलादेशचे नेतृत्व करणार आहे. याबाबत त्याने सांगितले, आता भारताविरुद्धच्या मालिकेत मी विराट कोहलीचा सामना करण्यास उत्सुक आहे. माझ्या मते तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे.

First Published on: November 8, 2019 5:17 AM
Exit mobile version