फुटबॉलचा जादूगार!

फुटबॉलचा जादूगार!

दिएगो मॅराडोना

फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ. भारतात ज्याप्रमाणे क्रिकेटला जणू धर्मच मानले जाते, त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, अर्जेंटिना, चिली यांसारख्या देशांमध्ये फुटबॉल हा जणू धर्मच आहे. त्यामुळे या देशांतील फुटबॉलपटूंवर वेगळाच दबाव असतो. बरेचसे खेळाडू या दबावाला बळी पडून कारकिर्दीत फारसे यश मिळवत नाहीत, तर काही खेळाडू या दबावाकडे दुर्लक्ष करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतात. याच काही मोजक्या, हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या फुटबॉलपटूंपैकी एक म्हणजे दिएगो अरमांडो मॅराडोना.

‘मॅराडोना सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू होता. इतर फुटबॉलपटूंना ज्या गोष्टी फुटबॉलसोबतही करता येत नव्हत्या, त्या मॅराडोना संत्र्यासोबत करायचा,’ असे म्हणत इटलीचे महान फुटबॉलपटू फ्रँको बरेसी यांनी दिएगो मॅराडोना यांची स्तुती केली होती. फुटबॉल इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची चर्चा होताना मॅराडोना आणि पेले ही दोन नावे प्रामुख्याने पुढे येतात. ‘मॅराडोना आणि पेले हे दोघेही महान खेळाडू होते. परंतु, दोघांमधील प्रमुख फरक म्हणजे मॅराडोना यांच्या संघात इतर उत्कृष्ट म्हणता येतील असे खेळाडू नव्हते. त्यांना त्यांच्या संघाला सामने जिंकवून द्यावे लागायचे. तुम्ही मॅराडोनाला अर्जेंटिना संघातून बाहेर काढले, तर अर्जेंटिना वर्ल्डकप जिंकू शकला नसता. मात्र, पेले नसतानाही ब्राझीलचा संघ यशस्वी झाला असता,’ असे फ्रांसचा माजी फुटबॉलपटू इरिक कॅन्टोना म्हणाला होता.

तसे मॅराडोना आणि पेले या दोघांमधील सर्वोत्तम खेळाडू कोण? या प्रश्नाचे उत्तर जरा अवघड आहे. परंतु, १९८६ वर्ल्डकपमधील मॅराडोना यांचा खेळ ज्याने पाहिला, तो दुसऱ्या एखाद्या फुटबॉलपटूला सर्वोत्कृष्ट म्हणणे जवळपास अशक्यच आहे. एक खेळाडू…एकट्याच्या जोरावर, त्याच्या देशाला वर्ल्डकप जिंकवून देऊ शकतो हे मॅराडोना यांनी १९८६ वर्ल्डकपमध्ये सिद्ध केले. मॅराडोना यांची कारकीर्द उत्कृष्ट, अविश्वसनीय खेळासोबतच वादविवादांनीही गाजली. खासकरून १९८६ वर्ल्डकपमधील अर्जेंटिना-इंग्लंड उपांत्यपूर्व फेरीचा सामना मॅराडोना यांच्या वादग्रस्त आणि तितक्याच उत्कृष्ट खेळामुळे अविस्मरणीय ठरला.

या सामन्यात अर्जेंटिनाने २-१ असा विजय मिळवला आणि अर्जेंटिनाच्या या विजयात मॅराडोना यांची प्रमुख भूमिका होती. मॅराडोना यांनी या सामन्यातील अर्जेंटिनाचे दोन्ही गोल केले, पण हे गोल वेगवेगळ्या कारणांनी आजही लोकप्रिय आहेत. मॅराडोना यांनी ५१ व्या मिनिटाला अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हा गोल होताना चेंडू मॅराडोनाच्या हाताला लागला होता. मात्र, रेफ्रीला ते लक्षात न आल्याने तो गोल ठरवण्यात आल्या, ज्याला ‘हँड ऑफ गॉड’ म्हणून संबोधले जाते. हा गोल फारच वादग्रस्त ठरला होता, जो इंग्लंडचे खेळाडू आणि चाहते आजही विसरू शकलेले नाहीत.

यानंतर चार मिनिटांनी मॅराडोना यांनीच अर्जेंटिनाची आघाडी दुप्पट केली, पण या दुसऱ्या गोलमध्ये मात्र वादग्रस्त असे काहीही नव्हते. या गोलमध्ये होती ती, मॅराडोना या अभूतपूर्व खेळाडूची जादू. त्यांनी इंग्लंडच्या तब्बल पाच खेळाडूंना चकवत ६० मीटरचे अंतर पार करत हा जादुई गोल झळकावला. हा ‘शतकातील सर्वोत्तम गोल’ ठरला. उपांत्य फेरीत अर्जेंटिनाने बेल्जियमवर २-० अशी मात केली आणि अर्जेंटिनाचे दोन्ही गोल पुन्हा मॅराडोना यांनीच केले. अंतिम सामन्यात मात्र मॅराडोना यांना गोल करता आला नाही. परंतु, अर्जेंटिनाने पश्चिम जर्मनीचा ३-२ असा पराभव करत दुसऱ्यांदा वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. मॅराडोना यांना या वर्ल्डकपमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.

मॅराडोना यांनी बोका ज्युनियर्स, बार्सिलोना, नॅपोली यांसारख्या लोकप्रिय क्लब्सकडून खेळतानाही उत्कृष्ट कामगिरी केली होती. खासकरून इटालियन संघ नॅपोलीकडून खेळताना त्यांचा खेळ अधिकच बहरला. सात वर्षे या संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी २५९ सामन्यांत ११५ गोल केले. नॅपोली हा तसा फारसा लोकप्रिय संघ नव्हता, पण मॅराडोना यांच्या एंट्रीनंतर नॅपोलीकडे पाहण्याचा फुटबॉल चाहत्यांचा दृष्टिकोन बदलला. मॅराडोना संघात असताना नॅपोलीने १९८६-८७ आणि १९८९-९० असे दोनदा ‘सेरिया ए’ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. नॅपोलीला त्याआधी आणि त्यानंतरही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.

मॅराडोना यांची फुटबॉल कारकीर्द जितकी गाजली, तितकेच त्यांचे मैदानाबाहेरील वादही गाजले. ड्रग्जच्या आहारी गेल्यामुळे मॅराडोना अनेकदा अडचणीत सापडले. १९९४ वर्ल्डकपमध्ये उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे मॅराडोना यांना केवळ दोनच सामने खेळता आले. हे त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचे दोन सामने ठरले. आपल्या १७ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मॅराडोना यांनी ९१ सामन्यांत ३४ गोल केले. तसेच अर्जेंटिनाला एक वर्ल्डकप जिंकवून दिला. आता त्यांनी या जगाला अलविदा केले असले तरी, या फुटबॉलच्या जादूगाराला कधीही कोणीही विसरू शकणार नाही.

 

 

First Published on: November 29, 2020 3:00 AM
Exit mobile version