ENG vs NZ : इंग्लंडच्या फलंदाजांना कसोटी क्रिकेट खेळता येत नाही; माजी कर्णधाराची टीका

ENG vs NZ : इंग्लंडच्या फलंदाजांना कसोटी क्रिकेट खेळता येत नाही; माजी कर्णधाराची टीका

इंग्लंडचा फलंदाज झॅक क्रॉली

न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव करत दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० अशी खिशात घातली. एजबॅस्टन येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने ८ विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यात खासकरून इंग्लंडच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या डावात सलामीवीर रोरी बर्न्स (८१) आणि डॅन लॉरेंस (८१) वगळता इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. तर दुसऱ्या डावात इंग्लंडचे केवळ दोन फलंदाज २० हून अधिक धावा करू शकले. इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १२२ धावांत आटोपला. न्यूझीलंडला चौथ्या डावात सामना जिंकण्यासाठी ३८ धावांचे आव्हान मिळाले, जे त्यांनी ८ विकेट राखून गाठले. इंग्लंडच्या फलंदाजांनी या कसोटीत आणि मागील काही सामन्यांत केलेल्या कामगिरीवर इंग्लंडचा माजी कर्णधारअ‍ॅलिस्टर कुकने टीका केली.

दबाव टाकल्यास खेळ खालावतो

कसोटी क्रिकेटमध्ये जेव्हा दडपण येते, तुम्ही जेव्हा जिद्द दाखवण्याची गरज असते, तेव्हा इंग्लंडच्या फलंदाजांना अपयश येते. त्यांना कसोटी क्रिकेट खेळता येत नाही. त्यांचे फलंदाजीचे तंत्र विचित्र आहे. परंतु, त्यांनी कौंटी क्रिकेटमध्ये धावा केल्या असून कसोटीतही त्यांना थोडेफार यश मिळाले आहे. मात्र, त्यांना दबाव हाताळता येत नाही. त्यांच्यावर दबाव टाकल्यास त्यांचा खेळ खालावतो. माझ्या मते, ही चिंता करण्याची गोष्ट आहे, असे कुक म्हणाला.

संघामध्ये बदल करण्याची ही वेळ नाही

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या न्यूझीलंडने दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० अशी जिंकली. इंग्लंडची आपल्या घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावण्याची ही २०१४ नंतर पहिलीच वेळ होती. आता इंग्लंडची पुढील कसोटी मालिका भारताविरुद्ध होणार आहे. परंतु, त्या मालिकेपूर्वी इंग्लंडने संघात फार मोठे बदल करणे टाळले पाहिजे असे कुकला वाटते. संघामध्ये खूप बदल करण्याची ही वेळ नाही, असे कुक म्हणाला.

First Published on: June 14, 2021 3:53 PM
Exit mobile version