IPL : टी-२० क्रिकेटमध्ये सहा हजारहून अधिक धावा, पण ‘या’ इंग्लिश फलंदाजाला आयपीएलमध्ये कधीही संधी नाही!

IPL : टी-२० क्रिकेटमध्ये सहा हजारहून अधिक धावा, पण ‘या’ इंग्लिश फलंदाजाला आयपीएलमध्ये कधीही संधी नाही!

टी-२० क्रिकेटमध्ये सहा हजारहून अधिक धावा, पण 'या' इंग्लिश फलंदाजाला आयपीएलमध्ये कधीही संधी नाही

इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी-२० स्पर्धा मानली जाते. सर्व आघाडीच्या भारतीय खेळाडूंसह एबी डिव्हिलियर्स, डेविड वॉर्नर, क्रिस गेल, आंद्रे रसेल, किरॉन पोलार्ड आणि पॅट कमिन्स यांसारखे सर्वोत्तम परदेशी क्रिकेटपटू या स्पर्धेमध्ये खेळतात. त्यामुळे टी-२० स्थानिक लीगमध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत आयपीएल वर्षानुवर्षे अव्वल स्थानावर आहे. आयपीएलचे आता १४ मोसम झाले आहेत. परंतु, अजूनही काही असे खेळाडू आहेत, ज्यांना जगभरातील इतर स्पर्धांमधील चांगल्या कामगिरीनंतरही आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. आयपीएल स्पर्धेत न खेळता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये इंग्लंडच्या जेम्स विन्सचा अव्वल क्रमांक लागतो.

१२ टी-२० सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व

३० वर्षीय विन्सने आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये २४६ सामन्यांमध्ये ६५४४ धावा केल्या आहेत. त्याने या धावा ३०.४३ च्या सरासरीने आणि १३३.७४ च्या स्ट्राईक रेटने केल्या असून यात एक शतक आणि ४१ अर्धशतकांचा समावेश आहे. तो ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेत सिडनी सिक्सर्स संघाकडून, तर पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत मुलतान सुल्तान्स या संघाकडून खेळतो. तसेच त्याने १२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, त्याला अजून आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.

इंग्लंडचा फलंदाज जेम्स विन्स बिग बॅश लीग स्पर्धेत सिडनी सिक्सर्सकडून खेळतो

बाबर आझमलाही संधी नाही 

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विन्स ३१ व्या स्थानावर आहे. त्याच्या खालोखाल पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा क्रमांक लागतो. बाबरने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत १७७ सामन्यांमध्ये ६३०४ धावा केल्या आहेत. त्याची सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होते. परंतु, पाकिस्तानचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत नसल्याने त्याला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळालेली नाही.

First Published on: June 5, 2021 3:08 PM
Exit mobile version