लिव्हरपूलचा सलग १८ वा विजय; विक्रमाशी बरोबरी

लिव्हरपूलचा सलग १८ वा विजय; विक्रमाशी बरोबरी

साडिओ मानेने अखेरच्या काही मिनिटांत केलेल्या गोलमुळे लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात वेस्ट हॅम युनायटेडचा ३-२ असा पराभव केला. लिव्हरपूलचा हा या स्पर्धेतील सलग १८ वा विजय होता. त्यामुळे त्यांनी मँचेस्टर सिटीच्या विक्रमाशी बरोबरी केली. सिटीने २०१७-१८ मोसमात सलग १८ सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. लिव्हरपूलने यंदाच्या मोसमात २७ पैकी २६ सामने जिंकले आहेत. मागील ऑक्टोबरमध्ये मँचेस्टर युनायटेडने त्यांना बरोबरीत रोखले होते. त्यानंतर मात्र एकाही संघाला त्यांना रोखता आलेले नाही. त्यामुळे ७९ गुणांसह ते गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहेत. गतविजेता मँचेस्टर सिटीचा संघ दुसर्‍या स्थानावर असून त्यांचे २७ सामन्यांत ५७ गुण आहेत.

लिव्हरपूल आणि वेस्ट हॅम यांच्यातील प्रीमियर लीगचा सामना चुरशीचा झाला. नवव्या मिनिटाला ट्रेंट अलेक्झांडर-अर्नोल्डच्या क्रॉसवर जोर्जिनिओ वाईनाल्डमने हेडर मारत गोल केला आणि लिव्हरपूलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, त्यांना ही आघाडी तीन मिनिटेच राखता आली. १२ व्या वेस्ट हॅमला कॉर्नर किक मिळाली. रॉबर्ट स्नोडग्रासच्या पासवर इसा डीयोपने हेडर मारत गोल करुन वेस्ट हॅमला १-१ अशी बरोबरी करुन दिली. यानंतर दोन्ही संघांच्या बचावफळ्यांनी आपला खेळ उंचावला. त्यामुळे कोणत्याही संघाला गोल करण्याच्या फारशा संधी मिळाल्या नाही. ४० व्या मिनिटाला लिव्हरपूलच्या वर्जिल वॅन डाईकने मारलेला हेडर गोल बारला लागला. त्यामुळे मध्यंतराला सामन्यात १-१ अशी बरोबरी होती.

उत्तरार्धात या सामन्यात अधिक रंगत आली. ५४ व्या मिनिटाला पाब्लो फोर्नाल्सने गोल करत वेस्ट हॅमला अनपेक्षित २-१ अशी आघाडी मिळवून दिली. पिछाडीवर पडल्यामुळे लिव्हरपूलने अधिक आक्रमक खेळ करण्यात सुरुवात केली आणि याचा फायदा त्यांना ६८ व्या मिनिटाला मिळाला. मोहम्मद सलाहने मारलेला फटका अडवण्यात वेस्ट हॅमचा गोलरक्षक लुकास फाबियान्स्की चुकला. त्यामुळे सामन्यात २-२ अशी बरोबर झाली. लिव्हरपूलने पुढेही आक्रमण सुरु ठेवले. ८१ व्या मिनिटाला अलेक्झांडर-अर्नोल्डच्या पासवर साडिओ मानेने गोल करत लिव्हरपूलला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. वेस्ट हॅमला पुनरागमन करता आले नाही आणि त्यामुळे त्यांनी हा सामना गमावला.

First Published on: February 26, 2020 5:11 AM
Exit mobile version