महापौर चषक कबड्डी स्पर्धेच्या बक्षिसात वाढ

महापौर चषक कबड्डी स्पर्धेच्या बक्षिसात वाढ

कबड्डी स्पर्धा

मुंबई शहर कबड्डी असो.मुंबई महानगर पालिकेच्या सहकार्याने १ ते ४ मार्च २०१९ या कालावधीत व्यावसायिक पुरुष व स्थानिक महिला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. यंदाच्या वर्षी या स्पर्धेत रोख रकमेच्या बक्षिसात भरघोस वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत दोन्ही विभागांकरिता समान रोख रकमेची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. पुरुष व महिला गटातील अंतिम विजयी संघांना “महापौर चषक” व रोख रु. एक लाख, तर उपविजयी संघांना चषक व रोख रु.पंचाहत्तर हजार प्रदान करण्यात येतील.दोन्ही गटातील उपांत्य उपविजयी संघांना प्रत्येकी चषक व रोख रु.पंचवीस हजार देऊन सन्मानित करण्यात येईल. शिवाय स्पर्धेत सर्वोत्तम ठरणार्‍या दोन्ही गटातील खेळाडूस प्रत्येकी रोख रु.दहा हजार देण्यात येतील. तसेच दोन्ही गटात स्पर्धेतील उत्कृष्ट पकड व चढाईच्या खेळाडूस प्रत्येकी रोख रु.सहा हजार देण्यात येतील. या स्पर्धेच्या निमित्ताने रु.सहा लाखच्या जवळपास रोख रकमेच्या बक्षिसांचे वाटप होईल.

महाराष्ट्र राज्य असो.च्या मान्यतेने ना.म.जोशी मार्ग,मुंबई येथील श्रमिक जिमखाना येथे होणार्‍या या स्पर्धेत पुरुष गटात एअर इंडिया, भारत पेट्रोलियम, महिंद्रा, मध्य रेल्वे,युनियन बँक, देना बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक,मुंबई पोलीस, मुंबई बंदर,जे.जे.हॉस्पीटल, नाशिक आर्मी, बी.ई. जी. सह यजमान मुंबई महानगर पालिका आदी मातब्बर व्यावसायिक संघ सहभागी होणार आहेत.महिला गटात शिवशक्ती, डॉ.शिरोडकर, अमरहिंद,महात्मा गांधी,संघर्ष क्लब, स्वराज्य स्पोर्ट्स, होतकरू मंडळ,शिवतेज मंडळ,बालचीन मंडळ, राजमाता जिजाऊ, सुवर्णयुग आदी संघ सहभागी होणार आहेत.

अशी खेळवली जाईल स्पर्धा

या स्पर्धेकरिता ३ मैदाने तयार करण्यात येत असून सामने सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येतील.या स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्व संघाची ४ गटात विभागणी करण्यात येणार असून स्पर्धा प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील.या स्पर्धेची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून पदाधिकारी व कार्यकर्ते स्पर्धेच्या यशस्वी साठी जोमाने कार्यरत झाले आहेत. मुंबईतील मानाची स्पर्धा पहाण्यासाठी मुंबईतील तमाम कबड्डी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा असे जाहीर आवाहन मुंबई शहर कबड्डी असो.चे सचिव विश्वास मोरे यांनी केले आहे.

First Published on: February 28, 2019 4:46 AM
Exit mobile version