ऑलिम्पिकमध्ये नेमबाजांकडून खूप अपेक्षा!

ऑलिम्पिकमध्ये नेमबाजांकडून खूप अपेक्षा!

भारताच्या नेमबाजांनी नुकत्याच रिओ डी जानेरो येथे झालेल्या रायफल/पिस्तूल विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली. त्यांनी या स्पर्धेत एकूण ९ पदके पटकावली,ज्यात ५ सुवर्णपदकांचा समावेश होता. हे नेमबाज गुरुवारी मायदेशी परतले. त्यानंतर त्यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेतली. रिजिजू यांनी नेमबाजांचे त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले. तसेच आता हे नेमबाज आपला चांगला फॉर्म कायम राखत २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्येही खूप यश मिळवतील अशी आशा रिजिजू यांनी व्यक्त केली.

भारताच्या नेमबाजांनी विश्वचषकात कौतुकास्पद कामगिरी केली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि पदके मिळवल्याबद्दल मी संपूर्ण संघाचे अभिनंदन करतो. आपण टोकियो ऑलिम्पिकमध्ये नवा विक्रम प्रस्थपित करणार आहोत. या ऑलिम्पिकमध्ये आपले सर्वाधिक नेमबाज सहभागी होणार आहेत. आपल्या ९ नेमबाजांना ऑलिम्पिक कोटा मिळाला आहे आणि एकूण आपल्या १२ नेमबाजांना ऑलिम्पिक कोटा मिळू शकतो असे मला सांगण्यात आले आहे. आपल्याकडे सध्या जगातील सर्वोत्तम नेमबाज आहेत. आता हे प्रतिभावान नेमबाज ऑलिम्पिकमध्ये यश संपादन करतील अशी मला आशा आहे. मला त्यांच्याकडून बर्‍याच पदकांची अपेक्षा आहे, असे रिजिजू शुक्रवारी नेमबाजांना भेटल्यानंतर म्हणाले.

First Published on: September 7, 2019 2:00 AM
Exit mobile version