नागपुरात आज फायनल निकाल

नागपुरात आज फायनल निकाल

तब्बल दोन वर्षांनंतर नागपूरला टी-२० क्रिकेट सामन्याचे यजमानपद मिळाले असून आज रविवार १० नोव्हेंबरला भारत आणि बांगलादेश यांच्यातील लढत होत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने दुसरा सामना जिंकून बरोबरीत आल्यामुळे तिसर्‍या सामन्याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.

टीम इंडियाच्या मजबूत व कमकुवत बाजू रोहित शर्मा , शिखर धवन, लोकेश राहुल ही तगडी आघाडीची फळी भारताकडे आहे. रोहित आणि धवन यांनी आपापली भूमिका चोख बजावली आहे. राहुलला साजेशी कामगिरी करता आली नाही. श्रेयस अय्यरने साजेशी कामगिरी केली आहे. रिषभ पंत याचे अपयश हे टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकते. त्याने यष्टिमागेही निराश केले आहे. त्यामुळे तिसर्‍या सामन्यात त्याला बसवले जावे, अशी मागणी होत आहे. पंतला पर्याय म्हणून संघात संजू सॅमसन हा पर्याय आहे. शिवाय मनीष पांडेला संधी देऊन राहुलला यष्टिमागे जबाबदारी सांभाळण्यास देता येईल.

गोलंदाजी हा भारतासाठी चिंतेची बाब आहे. प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. परंतु त्यांना त्यावर खरे उतरता आलेले नाही. युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी फिरकीची जबाबदारी सक्षमपणे पेलली आहे. पण, जलद मार्‍यात टीम इंडियाला मार खावा लागला आहे. दीपक चहरच सातत्यपूर्ण खेळ करताना पाहायला मिळत आहे. त्याला खलिल अहमदकडून साजेशी साथ मिळालेली नाही. नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या शिवम दुबेकडे तितकासा अनुभव नाही. त्यामुळे खलिल आणि शिवम यांच्या जागी अनुक्रमे शार्दूल ठाकूर व मनीष पांडे यांना संधी मिळू शकते.

वाहतुकीच्या खोळंब्याचे आव्हान

वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी स्टेडियमपर्यंतच्या मार्गावर चारशेहून अधिक वाहतूक पोलीस आणि त्यांना मदतीसाठी वाहतूक स्वयंसेवक ठेवण्यात येणार आहेत. यापूर्वी झालेल्या एकदिवसीय किंवा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या दरम्यान वाहतुकीचा खोळंबा होण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यातच यंदा खापरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून सामना सुटल्यानंतर एकाचवेळी सर्व वाहने एकाच दिशेने येऊन वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता नाकारण्यात येत नसल्याने पोलिसांकडून सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा मैदानावर होणार्‍या या लढतीत सामना स्टेडियममध्ये बसून पाहण्याचे जुगाड आतापासून सुरू आहे. तर दुसरीकडे स्टेडियमच्या मार्गात असलेल्या खापरी पुलाचे काम सुरू असल्याने जामठा स्टेडियमकडे जाणारा मार्ग ’जाम’ होण्याची शक्यता वाढली आहे.

First Published on: November 10, 2019 5:39 AM
Exit mobile version