French Open : ‘उत्कृष्ट कमबॅक’! सचिन, लक्ष्मणने केली विजेत्या जोकोविचची स्तुती

French Open : ‘उत्कृष्ट कमबॅक’! सचिन, लक्ष्मणने केली विजेत्या जोकोविचची स्तुती

नोवाक जोकोविचने पटकावले फ्रेंच ओपनचे जेतेपद

सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकत आपल्या कारकिर्दीतील १९ वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पहिले दोन सेट गमावल्यानंतर जोकोविचने दमदार पुनरागमन करत ग्रीसच्या स्टेफानोस त्सीत्सीपासचा ६-७, २-६, ६-३, ६-२, ६-४ असा पराभव केला. हा सामना चार तासांहूनही अधिक वेळ चालला. त्याआधी उपांत्य फेरीत त्याने १३ वेळच्या फ्रेंच ओपन विजेत्या राफेल नदालचा पराभव केला होता. त्या सामन्यातही जोकोविचने पहिला सेट गमावल्यानंतर उत्कृष्ट पुनरागमन करत नदालला पराभूत केले होते. जोकोविचने उपांत्य आणि विशेषतः अंतिम फेरीत दाखवलेल्या जिद्दीबद्दल भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांनी त्याची स्तुती केली.

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर

‘अप्रतिम अंतिम सामना. अवघड सामन्यांनंतरही जोकोविचने उत्कृष्ट पुनरागमन केले. तो खेळाच्या दृष्टिकोनातून, तसेच शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या कणखर होता. या गोष्टीमुळेच तो अंतिम सामना जिंकू शकला. त्सीत्सीपासनेही उत्तम खेळ केला. भविष्यात तो बऱ्याच ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकेल याची खात्री आहे,’ असे सचिनने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले.

जोकोविच खरा चॅम्पियन 

‘१९ वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावल्याबद्दल नोवाक जोकोविचचे अभिनंदन. पहिले दोन सेट गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करणे आणि सामना जिंकणे, या गोष्टी तो मानसिकदृष्ट्या किती कणखर आहे आणि त्याच्यात किती आत्मविश्वास आहे, हे दाखवतात. तो खरा चॅम्पियन आहे,’ असे लक्ष्मण त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला.

First Published on: June 14, 2021 2:57 PM
Exit mobile version