गेलच ७९; किंग्स इलेव्हन पंजाब १८४

गेलच ७९; किंग्स इलेव्हन पंजाब १८४

क्रिस गेल

धडाकेबाज सलामीवीर क्रिस गेल आणि सर्फराज खानच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या १२ व्या मोसमाच्या आपल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध चांगली सुरुवात केली. त्यांनी २० षटकांत ४ विकेट गमावत १८४ धावा केल्या.

जयपूर येथे झालेल्या या सामन्यात राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पंजाबच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचा सलामीवीर लोकेश राहुलला अवघ्या ४ धावांवर धवल कुलकर्णीने बाद केले. मात्र, यानंतर क्रिस गेल आणि मयांक अगरवाल यांनी संयमाने फलंदाजी केली. त्यांनी जवळपास ८ षटकांत ५६ धावांची भागीदारी केली. २२ धावांवर असताना अगरवाल कृष्णप्पा गौथमच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या नादात बाद झाला.

धवलने सीमारेषेवर त्याचा अप्रतिम झेल पकडला. यानंतर गेल आणि सर्फराज खानने आक्रमक फलंदाजी केली. गेलने जयदेव उनाडकटच्या एकाच षटकात ३ चौकार आणि १ षटकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. पुढेही त्याने आक्रमक फलंदाजी सुरु ठेवली. पण, ७९ धावांवर तो बाद झाला. त्याने या धावा ४७ चेंडूंत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने केल्या. त्याने आणि सर्फराजने तिसर्‍या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. यानंतर सर्फराजने २९ चेंडूंत ४६ धावा करत पंजाबची धावसंख्या १८४ पर्यंत पोहोचवली. राजस्थानकडून बेन स्टोक्सने २ विकेट घेतल्या.

संक्षिप्त धावफलक –

किंग्स इलेव्हन पंजाब : २० षटकांत ४ बाद १८४ (क्रिस गेल ७९, सर्फराज खान ४६; बेन स्टोक्स २/४८) वि. राजस्थान रॉयल्स.

गेलच्या ४००० धावा पूर्ण

ख्रिस गेलने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएलमधील ४००० धावा पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा रैना आघाडीवर आहे. रैनाने १७७ सामन्यांत ५००४ धावा केल्या आहेत. यानंतर या यादीत रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचा विराट कोहली (४९५४), मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा (४५०७), गौतम गंभीर (४२१७), कोलकाता नाइट रायडर्सचा रॉबिन उथप्पा (४१२१), दिल्ली कॅपिटल्सचा शिखर धवन (४१०१), सनरायझर्स हैद्राबादचा डेविड वॉर्नर (४०९९) आणि चेन्नई सुपर किंग्सचा महेंद्रसिंग धोनी (४०१६) यांचा क्रमांक येतो.

First Published on: March 26, 2019 4:28 AM
Exit mobile version