गतवर्षीचे विजेते जर्मनी स्पर्धेबाहेर, कोरियाकडून २-० ने पराभव

गतवर्षीचे विजेते जर्मनी स्पर्धेबाहेर, कोरियाकडून २-० ने पराभव

सामना हरल्यानंतर निराश जर्मनीचा संघ

फिफा विश्वचषकाचे एफ गटातील बाद फेरीत जाण्यासाठीचे सामने पार पडले. त्यात कोरियाने जर्मनीला २-० ने हरवत स्पर्धेबाहेर केले आहे. कोरिया संघाचे विश्वचषकातील आव्हान याआधीच संपुष्टात आले असले तरी त्यांनी जाता-जाता विजय मिळवत स्पर्धेचा शेवट गोड केला. त्याचवेळी सुरू असलेल्या एफ गटातील स्वीडनविरूद्ध मेक्सिको सामन्यात स्वीडनने मेक्सिकोवर ३-० असा विजय मिळवत बाद फेरी गाठली. तर, याचसोबत आधीच्या जास्त गुणांमुळे मेक्सिको देखील बाद फेरीत पोहोचली आहे.

जर्मनी आणि कोरिया यांच्यातील सामन्यात ९० मिनिटांपर्यंत दोन्ही संघाचा एकही गोल झाला नाही. त्यामुळे देण्यात आलेल्या अतिरीक्त ६ मिनिटामध्ये कोरियाच्या कीम यंग-ग्वानने दुसऱ्या मिनिटाला गोल केला आणि सामन्यात कोरियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जर्मनीने आक्रमक खेळ दाखवला खरा मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट शेवटच्या मिनिटाला कोरियाच्या ह्यूंग मीन याने गोल करत कोरियाला २-० असा विजय मिळवून दिला आणि जर्मनी स्पर्धेबाहेर गेली.

विजयानंतर आनंद व्यक्त करताना कोरियाचा संघ

जर्मनीने आपला पहिला सामना मेक्सिको विरोधात १-० ने हरला तेव्हाच जर्मनीचे या विश्वचषकात काही खरे नाही अशाप्रकारच्या चर्चा होऊ लागल्या होत्या मात्र दुसऱ्या सामन्यात स्वीडनला २-१ ने हरवत जर्मनीने विश्वचषकात पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कोरिया विरूद्धचा सामना जिंकणे जर्मनीसाठी अनिवार्य होते. मात्र कोरियाच्या बचावफळीपुढे जर्मनीचा काही निभाव लागला नाही. या सामन्यात जर्मनीला २-० ने हार मानावी लागली असून केवळ ३ गुण खात्यात असल्याने जर्मनीला विश्वचषकाच्या स्पर्धेबाहेर पडावे लागले.

First Published on: June 28, 2018 3:26 PM
Exit mobile version