Weight Lifting : पुण्याच्या हर्षदा गरुडची उंच झेप, जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक

Weight Lifting : पुण्याच्या हर्षदा गरुडची उंच झेप, जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक

ग्रीसमध्ये सुरु असलेल्या ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुण्याच्या हर्षदा शरद गरुड हिने सुवर्णपदक पटकावलं आहे. हर्षदा ही IWF ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणारी भारताची पहिली वेटलिफ्टर ठरली आहे. हर्षदाच्या या सुवर्णकामगिरीवर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हर्षदा गरुडचे अभिनंदन केले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वात पहिलं पदक हे मीराबाई चानू हिने वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकावलं आहे.

हर्षदा गरुड ही पुणे जिल्ह्यातील मावळ या ठिकाणची रहिवाशी असून ती बालपणापासून क्रिडाक्षेत्रात सक्रिय आहे. वेटलिफ्टिंग या खेळात तिला आधीपासूनच रस होता. याबाबत तिने प्रशिक्षणही घेतले आहे. मात्र, त्यानंतर आता हर्षदाने ग्रीस-हेराकिलॉन येथील या जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतासाठी पहिलंवहिलं सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे.

हर्षदाने महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. हा पराक्रम सर्वांसाठी अभिमानास्पद आणि अनेकांना प्रेरणादायी असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हर्षदाचं अभिनंदन करत तिला पुढील भविष्यातील सुवर्णकामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तिने केलेल्या या सुवर्णकामगिरीमुळे अवघ्या देशाला तिचा अभिमान वाटत आहे.

दोन महिन्यांपूर्वी अन्नातून विषबाधा झाल्यामुळे आजारी असलेल्या हर्षदाने जागतिक ज्युनियर स्पर्धेत अव्वल येण्याचे स्वप्न पूर्ण करून दाखवले. ग्रीसमधील हेराकिलॉन येथील स्पर्धेत हर्षदाने एकूण १५३ किलो वजन उचलून ४५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. दोन वर्षांपूर्वी अचंता शेऊलीने ७३ किलो गटात रौप्यपदक जिंकले होते. हीच भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती.


हेही वाचा : कोकण रेल्वेमध्ये परीक्षेविनाच मेगा भरती, किती आहेत रिक्त पदं?


 

First Published on: May 3, 2022 4:19 PM
Exit mobile version