आला…फिफा विश्वचषक २०२२ चा पहिला धक्कादायक निकाल

आला…फिफा विश्वचषक २०२२ चा पहिला धक्कादायक निकाल

दोहा : फिफा विश्वचषक २०२२ च्या क गटात पहिला धक्कादायक निकाल समोर आला आहे. बलाढ्य अर्जेंटिना संघाला सौदी अरेबियाने २-१ ने पराभूत केले. कर्णधार मेस्सीने अर्जेंटिनासाठी निश्चितपणे गोल केला, पण नंतर तो आपल्या संघासाठी एकही गोल करू शकला नाही. १९७८ व १९८६ असा दोन वेळच्या विश्वचषक विजेत्या अर्जेंटिनावर सौदी अरेबियाने ०-१ पिछाडीवरून २-१ असा विजय मिळवला. कतारमध्ये आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या दोन दिवसांत यजमान कतारसह इराणला देखील हार मानावी लागली होती. त्यामुळे आशियाई संघांकडून फारशी कोणी अपेक्षा ठेवत नव्हते त्यात सौदी अरेबियाचाही समावेश होता, परंतु त्यांनी चमत्कार केला आणि लिओनेल मेस्सीच्या संघाला पराभवाचा धक्का दिला.

अर्जेंटिनासाठी पहिला गोल तसेच या सामन्यातील पहिला गोल संघाचा कर्णधार मेस्सीने केला. १०व्या मिनिटाला मेस्सीला पेनल्टी मिळाली आणि त्याने त्याचे सहज रुपांतर केले. या गोलमुळे अर्जेंटिनाने पहिल्या दहा मिनिटांत आपला स्कोअर १-० असा केला. यानंतर अर्जेंटिनाच्या संघाला पूर्वार्धात एकही गोल करता आला नाही, तर सौदी अरेबियालाही गोल करण्यात अपयश आले. पहिल्या हाफअखेर अर्जेंटिनाचा संघ १-० ने आघाडीवर होता.
उत्तरार्धात सौदी अरेबियाच्या संघाने शानदार पुनरागमन केले आणि खेळाच्या ४८व्या मिनिटाला सालेह एलशेहरीने आपल्या संघासाठी पहिला गोल करून स्कोअर १-१ असा केला. यानंतर सालेमने ५३व्या मिनिटाला दुसरा गोल करत सौदी अरेबियाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. या सामन्यात ९० मिनिटांचा खेळ संपेपर्यंत सौदी अरेबियाने २-१ अशी आघाडी कायम ठेवली होती. यानंतर दोन्ही संघांना १४ मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. या अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाने गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र सौदीचा बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही.

 

First Published on: November 22, 2022 8:55 PM
Exit mobile version