Hockey World Cup 2018 : भारताची दमदार सुरुवात

Hockey World Cup 2018 : भारताची दमदार सुरुवात

मनदीपने केला भारताचा पहिला गोल

मनदीप सिंग, आकाशदीप सिंग, सिमरनजीत सिंग (२ गोल) आणि ललित उपाध्यायने केलेल्या गोलमुळे भारताने हॉकी विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात द.आफ्रिकेचा ५-० असा धुव्वा उडवला. २ गोल करणाऱ्या सिमरनजीतला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

मध्यंतरापर्यंत २-० आघाडी 

या सामन्याच्या पहिल्या सत्राची सुरुवात भारताने चांगली केली. भारताला पहिल्या काही मिनिटांच गोल करण्याच्या संधी मिळाल्या. पण त्यांना गोल करता आला नाही. मात्र, १० व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर मनदीप सिंगने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तर १२ व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने गोल करत भारताचा स्कोर २-० असा केला. तर दुसऱ्या सत्रातही भारताने आपले वर्चस्व कायम ठेवले. मात्र, भारताला आपली आघाडी वाढवता आली नाही. त्यामुळे मध्यंतरापर्यंत भारताने २-० अशी आघाडी कायम ठेवली.

तीन मिनिटे, तीन गोल   

तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला द.आफ्रिकेने चांगला खेळ केला. त्यांनी भारताची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. पण ते गोल करू शकले नाही. मात्र, ४३ व्या मिनिटाला मनदीपने ‘काउंटर अटॅक’ करत सिमरनजीत सिंगला पास दिला. सिमरनजीतने चेंडूला गोलची दिशा दाखवत भारताची आघाडी ३-० अशी केली. तर तिसरे सत्र संपणार इतक्यातच ललित उपाध्यायने आणखी एक गोल करत भारताची आघाडी ४-० अशी वाढवली. चौथ्या सत्राच्या सुरुवातीलाच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर सिमरनजित आपला दुसरा आणि भारताचा पाचवा गोल केला. भारताने ही आपली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत हा सामना ५-० असा जिंकला. भारताचा पुढचा साखळी सामना २ डिसेंबरला बेल्जियमविरुद्ध होईल.
First Published on: November 28, 2018 11:13 PM
Exit mobile version