माझी कोहलीशी तुलना नको!

माझी कोहलीशी तुलना नको!

भारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्याचा खेळ आणि त्याच्या फिटनेसचे इतर क्रिकेटपटू अनुकरण करतात. या खेळाडूंमध्ये पाकिस्तानच्या बाबर आझमचाही समावेश आहे. मागील एक-दोन वर्षांत बाबर पाकिस्तानचा प्रमुख फलंदाज म्हणून पुढे आला आहे. त्यामुळे काही वेळा चाहते, तसेच प्रसारमाध्यमे त्याची कोहलीसोबत तुलना करतात. मात्र, आता तरी कोहली आणि माझ्यात तुलना होऊ शकत नाही, असे बाबरने स्पष्ट केले.

कोहलीने आताच खूप यश संपादन केले आहे. तो त्याच्या देशातील लोकांसाठी एक उदाहरण आहे. आता तरी त्याच्यात आणि माझ्यात तुलना होऊ शकत नाही. मात्र, भविष्यात मला त्याच्याइतकेच यश मिळवायचे आहे. चाहते, प्रसारमाध्यमे माझ्यात आणि कोहलीमध्ये तुलना करतात. मात्र, जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणना होण्यासाठी मला अजून कसोटी क्रिकेटमध्ये बर्‍याच धावा कराव्या लागतील, असे बाबर म्हणाला.

कसोटीतील कामगिरी सुधारण्यावर भर!

बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये ५०, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५४ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ३९ ची आहे. त्यामुळे तो सध्या कसोटीतील कामगिरी सुधारण्यावर भर देत आहे. त्याविषयी बाबरने सांगितले, मी सध्या कसोटीतील कामगिरी सुधारण्यावर भर देत आहे. मला कसोटीत त्रिशतक करायचे आहे. सर्वोत्तम खेळाडू स्वतःसमोर काही लक्ष्य ठेवतात. कसोटीत सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचे माझे लक्ष्य आहे. मला आता लाल चेंडूविरुद्ध खेळताना खूप मजा येते. मी अधिक संयमाने फलंदाजी करण्यास शिकलो आहे.

First Published on: December 17, 2019 2:19 AM
Exit mobile version