सचिन, लक्ष्मणला सुनावणीसाठी बोलावल्यास बीसीसीआयचे सीईओ राहणार उपस्थित

सचिन, लक्ष्मणला सुनावणीसाठी बोलावल्यास बीसीसीआयचे सीईओ राहणार उपस्थित

सचिन, लक्ष्मण

भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांना काही दिवसांपूर्वी हितसंबंधाबद्दल बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी नोटीस पाठवली होती. हे दोघेही बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीवर कार्यरत असतानाही आयपीएल संघांचे मार्गदर्शक म्हणून काम करत असल्यामुळे त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली होती. या दोघांनीही या नोटीसला आधीच उत्तर दिले आहे. मात्र, आता या दोघांना सुनावणीसाठी जैन यांनी बोलावले, तर त्यावेळी बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आणि कायदेशीर समिती उपस्थित राहणार आहेत.

सचिन आणि लक्ष्मण या दोघांनीही जैन यांनी नोटीसला लेखी उत्तर पाठवताना त्यांच्यावर लावलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. मात्र, बीसीसीआयच्या नियमांनुसार त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी जैन यांच्यासमोर हजर रहावे लागू शकेल. जर तसे झाले तर या सुनावणीच्या वेळी बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बीसीसीआयचा एक सिनियर अधिकारी याबाबत मंगळवारी म्हणाला, काही प्रसार माध्यमांनी बीसीसीआयने आपले नियम बदलले असल्याचे वृत्त दिले होते. मात्र, यात तथ्य नाही. सौरव गांगुलीप्रमाणेच जर तेंडुलकर आणि लक्ष्मण यांना सुनावणीसाठी बोलवण्यात आले, तर त्यावेळी (बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी) राहुल जोहरी आणि कायदेशीर समिती तिथे उपस्थित असेल .

बीसीसीआय या खटल्याचा भाग आहे. तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो की, श्रीसंतबाबतही सुनावणी झाली होती आणि त्यावेळीही बीसीसीआयच्यावतीने जोहरी उपस्थित होते. यावेळी लोकपालांनी बीसीसीआयला पत्र लिहिले आहे, त्यामुळे बीसीसीआयचा सदस्य या सुनावणीला उपस्थित असणारच.

First Published on: May 1, 2019 4:48 AM
Exit mobile version