बिहारमध्‍ये एनडीए पुन्‍हा IPL मध्‍ये मुंबईच

बिहारमध्‍ये एनडीए पुन्‍हा IPL मध्‍ये मुंबईच

बिहार विधानसभा निवडणुकीची 243 जागांसाठीची मतमोजणी मंगळवारी सकाळी आठ वाजता सुरू झाली. कोविडमुळे मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. छपाईला जाण्यापूर्वी मिळालेल्या आकडेवारीनुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी १२२ जागांवर आघाडीवर होती. तर तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय लोकदल पक्षाच्या नेतृत्वाखालील महागठबंधनने ११४ जागांवर आघाडी घेतली आहे. सर्व एक्झिट पोलचे अंदाज चुकवत एनडीए सत्ता स्थापनेच्याजवळ पोहचली आहे. या निवडणुकीत भाजप ७२, जनता दल (संयुक्त) ४२, हिंदुस्थानी अवामी मोर्चा पक्ष ०४, विकशील इन्सान पक्ष-०४ जागांवर आघाडीवर होता. तर राष्ट्रीय जनता दल ७७, काँग्रेस १९, डावे पक्षांनी १८ जागांवर आघाडी घेतली होती. तर अपक्षांसह इतर पक्ष ०७ जागांवर आघाडीवर होते. बिहारच्या निवडणुकीवर सार्‍या देशाचे लक्ष लागले होते.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माझी शेवटची निवडणूक असल्याचे भावनिक आवाहन केले होते. मात्र मतदारांनी सरकारविरोधी मतदान केले. या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ठ्ये म्हणजे राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव हे कमालीचे ‘तेजस्वी’ निघाले. त्यांनी एकहाती आपल्या पक्षाला मोठे यश मिळवून दिले. त्यांच्या मेहनतीमुळे राष्ट्रीय जनता दल हा बिहार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरू पहात आहे. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला एकही जागा मिळाली नाही मात्र भाजपचा हनुमान असलेल्या चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांच्या लंकेला चांगलीच आग लावली. लोजपच्या उमेदवारांमुळे राष्ट्रीय जनता दलाच्या किमान १५ उमेदवारांना फटका बसला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असतानाही पूर्वी घोषणा केल्याप्रमाणे नितीशकुमार हेच मुख्यमंत्री होतील, असे भाजपकडून मंगळवारीही सांगण्यात आले. रात्री उशीरा मतमोजणीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाने केला असून राजदसह काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने त्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मुंबई इंडियन्स सलग दोनदा तर एकूण पाचव्यांदा विजयी

‘अनुभव कुठे विकत मिळत नाही, तर तो कमवावा लागतो,’ हे वाक्य खेळांमध्ये सतत वापरले जाते. याचाच प्रत्यय आयपीएलच्या तेराव्या मोसमाच्या अंतिम सामन्यात दुबईमध्ये आला. मुंबई इंडियन्सचा अनुभव दिल्ली कॅपिटल्सच्या युवा शक्तीवर भारी पडला. दुबईत झालेला अंतिम सामना ५ विकेटने जिंकत मुंबईने विक्रमी पाचव्यांदा आणि सलग दुसर्‍यांदा आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले. याआधी मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ अशी चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली होती. यापूर्वी चेन्नईनेही सलग दोनवेळा आयपीएल स्पर्धा जिंकली होती. यंदाही दिल्लीची जेतेपदाची पाटी कोरीच राहिली. रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरची अर्धशतके वाया गेली तर मुंबई इंडिन्सचा कर्णधार रोहित शर्माची ६८ धावांची खेळी उपयोगी पडली.

दिल्लीने अंतिम सामना जिंकण्यासाठी मुंबईसमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी मुंबईच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी चार षटकांतच ४५ धावांची भागीदारी रचल्यावर डी कॉकला (२०) मार्कस स्टोईनिसने बाद केले. रोहितने मात्र दुसर्‍या बाजूने आपली फटकेबाजी सुरु ठेवत ३६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे मुंबईच्या १०० धावा १२ षटकांतच फलकावर लागल्या. दरम्यान सूर्यकुमार यादव मात्र १९ धावांवर धावचीत झाला. तो बाद झाल्यावर रोहितला ईशान किशनची साथ लाभली. रोहित मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात माघारी परतला. त्याने ५१ चेंडूत ६८ धावा केल्या. मात्र, किशनने नाबाद ३३ धावा करत मुंबईला विजय मिळवून दिला.

त्याआधी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट सुरुवातीच्या षटकांत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत विकेट मिळवण्यासाठी ओळखला जातो. त्याने दिल्लीचा सलामीवीर मार्कस स्टोईनिसला पहिल्याच षटकात खातेही न उघडता माघारी पाठवले आणि अजिंक्य रहाणेला केवळ २ धावांवर बाद केले. तसेच फॉर्मात असलेल्या शिखर धवनला (१५) जयंत यादवने माघारी पाठवल्याने दिल्लीची ३ बाद २२ अशी अवस्था झाली. यानंतर मात्र कर्णधार अय्यर आणि रिषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी रचत दिल्लीचा डाव सावरला. पंतने यंदाच्या मोसमातील पहिले अर्धशतक झळकावताना ३८ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. नेथन कुल्टर-नाईलने त्याला बाद करत ही जोडी फोडली. अय्यरने मात्र त्यानंतरही आपली चांगली फलंदाजी सुरु ठेवली. त्याने अखेरच्या षटकांत फटकेबाजी केल्याने दिल्लीने २० षटकांत ७ बाद १५६ अशी धावसंख्या उभारली. अय्यरने ५० चेंडूत नाबाद ६५ धावांची खेळी केली.

First Published on: November 10, 2020 11:20 PM
Exit mobile version