IND vs PAK, WWC 2022: मितालीच्या नेतृत्वाखाली 10 व्यांदा पाकिस्तानवर विजय, भारताने 107 धावांनी जिंकला ’11 वा सामना’

IND vs PAK, WWC 2022: मितालीच्या नेतृत्वाखाली 10 व्यांदा पाकिस्तानवर विजय, भारताने 107 धावांनी जिंकला ’11 वा सामना’

mitali raj

नवी दिल्लीः आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सुरुवातीला चांगला सूर गवसलाय. भारतीय महिलांनी पाकिस्तानचा मोठ्या फरकाने पराभव केलाय, यासह त्यांनी स्पर्धेतील आपल्या प्रवासाची विजयी सुरुवात केलीय. या विजयासह भारताने पाकिस्तानविरुद्धच्या महिला वनडेतही आपली अजिंक्य मालिका कायम ठेवली. दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये आतापर्यंत खेळलेला हा 11वा एकदिवसीय सामना होता आणि तो सर्व भारतीय महिलांच्या नावावर झालाय. यात 11 पैकी मिताली राजच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानवरचा हा 10वा विजय आहे.

भारताच्या या विजयात फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडच्या चेंडूने आश्चर्यकारक कामगिरी केली, तर स्नेह राणाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीसह आपली छाप सोडली. भारताने पाकिस्तानविरुद्ध 11 वा सामना जिंकला आणि या सर्व विजयांमध्ये पाकिस्तानी महिलांनी आतापर्यंत 200 धावांचा टप्पा कधीच स्पर्श केला नव्हता. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ कोणत्याही सामन्यात भारतीय फलंदाजांनाही ऑलआउट करू शकला नाही.

भारताने पाकिस्तानला 245 धावांचे लक्ष्य दिले होते

भारताची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ज्या धडाडीनं तिनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे सुरुवात म्हणावी तशी दमदार झाली नाही. 114 धावांवर भारताने आपल्या 6 फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या. यादरम्यान केवळ स्मृती मानधना हिने अर्धशतकांचा टप्पा पार केला. तिने 52 धावा केल्या, तर दीप्ती शर्माने 40 धावांची खेळी केली. पण सातव्या विकेटसाठी केलेल्या विक्रमी भागीदारीचा भारताला 6 बाद 114 वरून 7 विकेट्सवर 245 धावांपर्यंत नेण्यात मोठा हात होता. ही भागीदारी पूजा वस्त्राकर आणि स्नेह राणा यांच्यात झाली. दोघांनी मिळून सातव्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. यामध्ये पूजाच्या 67 तर राणाच्या 53 धावांचे योगदान होते.

पाकिस्तानचा 107 धावांनी पराभव झाला

पाकिस्तानसमोर 245 धावांचे लक्ष्य होते. मात्र तो संघ 137 धावा करूनच ऑलआऊट झाला. पाकिस्तानच्या सर्व 10 विकेट 43व्या षटकातच पडल्या. भारताकडून राजेश्वरी गायकवाड हिने 10 षटकांत 31 धावा देत 4 बळी घेतले. त्यांच्याशिवाय झुलन गोस्वामी आणि स्नेह राणाने 2-2 बळी घेतले. या सामन्यात 67 धावांची खेळी करणाऱ्या पूजा वस्त्राकरला पाकिस्तानविरुद्धच्या 107 धावांच्या विजयात सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.


हेही वाचाः ind vs sri : शतकवीर जडेजामुळे भारताची कसोटीत पकड, पहिला डाव ५७४ धावांवर घोषित

First Published on: March 6, 2022 2:06 PM
Exit mobile version