IND vs SL : द्रविडच्या मार्गदर्शनात खेळण्यास उत्सुक; शिखर धवनचे वक्तव्य

IND vs SL : द्रविडच्या मार्गदर्शनात खेळण्यास उत्सुक; शिखर धवनचे वक्तव्य

शिखर धवन

भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला असून तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत डावखुरा सलामीवीर शिखर धवनला पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. तसेच भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड या संघाचे प्रशिक्षकपद भूषवत आहे. द्रविडसोबत काम करण्यास आणि त्याच्या मार्गदर्शनात खेळण्यास धवन उत्सुक आहे. तसेच कर्णधार म्हणून संघात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचे आणि सर्व खेळाडूंना आनंदी ठेवण्याचे धवनचे लक्ष्य आहे.

खेळाडूंना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न 

भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कर्णधार म्हणून सर्व खेळाडूंना एकत्रित आणि आनंदी ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल. तसेच संघात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचे माझे लक्ष्य आहे, असे धवन म्हणाला. माझे आणि राहुल द्रविडचे चांगले जुळते. मी रणजीमध्ये खेळण्यास सुरुवात केली होती, तेव्हा त्याच्याविरुद्ध खेळलो होतो. तेव्हापासून मी त्याला ओळखतो, असे धवन म्हणाला.

आमच्यात चर्चा झाली आहे

तसेच भारत ‘अ’ संघाचे मी याआधी नेतृत्व केले असून द्रविड त्या संघाचा प्रशिक्षक होता. तसेच तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही सातत्याने २० दिवस सराव करण्यासाठी तिथे जायचो. त्यामुळे याआधी आमच्यात चर्चा झाली आहे. आता सहा सामन्यांत आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळणार आहे. मी त्याच्या मार्गदर्शनात खेळण्यास उत्सुक असल्याचेही धवनने नमूद केले.

First Published on: July 15, 2021 9:45 PM
Exit mobile version